केडीएमसीकडून घनकचरा व्यवस्थापन कराची वसुली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:42 AM2021-05-07T04:42:33+5:302021-05-07T04:42:33+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाने नागरिकांकडून घनकचरा व्यवस्थापन कर आकारण्यास सुरुवात केली आहे. दर दिवसाला २ रुपये याप्रमाणे हा कर ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाने नागरिकांकडून घनकचरा व्यवस्थापन कर आकारण्यास सुरुवात केली आहे. दर दिवसाला २ रुपये याप्रमाणे हा कर आकारला असून, त्याची रक्कम मालमत्ताकराच्या बिलात समाविष्ट केली आहे. ऐन कोरोनाकाळात नागरिकांच्या माथी आणखीन एक कर लादण्यात आला आहे. त्यामुळे मालमत्ताकर भरणाऱ्या नागरिकांमध्ये याबाबत नाराजीचे वातावरण आहे.
घनकचरा व्यवस्थापन करआकारणीसंदर्भात भाजप सरकारच्या काळात निर्णय घेण्यात आला होता. मनपा हद्दीत एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रत्येक दिवसाला दोन रुपये याप्रमाणे महिन्याला ६० रुपये तर वर्षाला ७२० रुपये घनकचरा व्यवस्थापन कर मालमत्ताधारकाकडून आकारला जाणार आहे. मनपास वर्षाला या कराच्या वसुलीतून १० ते १२ कोटी उत्पन्न मिळणार आहे. नागरिकांच्या मालमत्ताकरात शिक्षण कर, वृक्ष कर, पाणीपुरवठा लाभकर आणि राज्याचा शिक्षण अधिभार, असे विविध कर आकारले जात आहेत. त्यात आणखी एका कराची भर पडली आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन बासरे म्हणाले, घनकचरा व्यवस्थापन कर हा जिजिया कर आहे. कोरोनाकाळात नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यात हा कर लादला आहे. मनपाने घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प कुठे राबविले आहेत. घनकचरा व्यवस्थापन योग्य असेल तर त्याचा कर घेता येतो. व्यवस्थापन नसताना कराची आकारणी कशासाठी? महासभेत करआकारणीचा ठराव केलेला नाही. मनपाची निवडणूक होऊन नवे सदस्य मंडळ अस्तित्वात आल्यावर या कर आकारणीचा विषय उपस्थित केला जाईल. तोपर्यंत ही कर आकारणी रद्द करावी.
कर कमी करण्याच्या मागणीची पूर्तताच नाही
- कोरोनाकाळात आधीच अनेकांच्या हाताला काम नाही. काहींचा रोजगार गेला आहे, तर अनेकांची वेतन कपात झाली आहे. त्यात हा नवीन कर नागरिकांच्या माथी मारला जात आहे.
- राज्यातील अन्य मनपांच्या तुलनेत केडीएमसी नागरिकांकडून जास्त करांची आकारणी करते. विविध कर मिळून ७१ टक्के कर आकारले जात आहेत.
- मनपाने जेव्हा बिल्डरांना मोकळ्या जागेवरील कराच्या दरात सूट दिली, तेव्हा नागरिकांकडून आकारले जाणारे कर कमी करावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याची पूर्तता केली गेली नाही. याउलट नवीन घनकचरा व्यवस्थापन कर लादला आहे.
---------------------