मीरा भाईंदर महापालिकेत होणार ३३९ पदांची भरती 

By धीरज परब | Published: February 23, 2023 04:39 PM2023-02-23T16:39:14+5:302023-02-23T16:40:27+5:30

मीरा भाईंदर महापालिकेसाठी राज्य शासनाने २०१९ साली आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम मंजूर करताना २५६४ पदांना पालिका आस्थापनेवर मान्यता दिली होती.

Recruitment of 339 posts will be held in Mira Bhayander Municipal Corporation | मीरा भाईंदर महापालिकेत होणार ३३९ पदांची भरती 

मीरा भाईंदर महापालिकेत होणार ३३९ पदांची भरती 

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेत सरळसेवेने ३३९ पदे कायम स्वरूपी सेवेत भरली जाणार असून राज्य शासनानेदेखील सदर पद भरतीस मंजुरी दिली आहे. महापालिका लवकरच ही भरती  प्रक्रिया सुरु करणार आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेसाठी राज्य शासनाने २०१९ साली आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम मंजूर करताना २५६४ पदांना पालिका आस्थापनेवर मान्यता दिली होती. मान्यता मिळालेल्या पदां पैकी १०७८ पदे रिक्त होती तर उर्वरित पदे भरलेली आहेत. १०७८ पदे रिक्त असली तरी दैनंदिन कामकाजाच्या अनुषंगाने अत्यावश्यक पदांची भरती करण्याचा निर्णय आयुक्त दिलीप ढोले यांनी घेतला होता. आयुक्तांच्या निर्देशा नुसार उपायुक्त मुख्यालय मारुती गायकवाड यांनी आवश्यक पदांचा आढावा घेऊन प्रस्ताव तयार केला होता.  पालिकेने १४ फेब्रुवारी रोजी शासनाच्या नगरविकास विभागाला  ३३९ पदे भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. 

नगरविकास विभागाने महापालिकेच्या भरती प्रस्तावास १९ फेब्रुवारी रोजीच्या पत्राने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे शासनाने ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट देखील या भरतीसाठी शिथिल केली आहे.  शासन निर्णयानुसार सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना ऑनलाईन पध्दतीने स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड व इस्टीट्युट ऑफ बॅकिंग पर्सोनल सिलेक्शन यापैकी कोणत्याही एका कंपनीची आश्यकतेनुसार निवड करून  त्या कंपनीद्वारे भरती करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. 

  या भरतीमध्ये वर्ग १ ची १४ पदे, वर्ग २ ची ९ पदे  तर वर्ग ३ ची ३१६  पदांचा समावेश आहे.  वर्ग ३ मध्ये मुख्यत्वे अग्निशमन दलातील अग्निशामक जवानांची तब्बल २२६ पदे भरली जाणार आहेत. कनिष्ठ अभियंत्यांची २४, वाहन चालकांची २१, वैद्यकीय अधिकारी यांची १० पदे तर अग्निशामक यंत्रचालकची ९ पदे सरळसेवेने भरली जाणार आहे. या शिवाय अन्य काही पदांचा सुद्धा समावेश आहे. 

कायम स्वरूपी पदे भरताना ठेका पद्धतीने भरलेली कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जाणार आहे. तर शासनाच्या मंजुरी नंतर संबंधित कंपन्यांना पत्र पाठवून भरती प्रक्रिया सुरु केली जाणार असून येत्या २ महिन्यात हि प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याची माहिती उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली.   

Web Title: Recruitment of 339 posts will be held in Mira Bhayander Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.