भरती प्रक्रियेलाही आचारसंहितेचा खो

By admin | Published: May 10, 2016 01:54 AM2016-05-10T01:54:45+5:302016-05-10T01:54:45+5:30

परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० बस चालकांविना धूळखात पडल्याने केडीएमटी प्रशासनाकडून भरती प्रक्रिया सुरू केली जाणार होती.

The recruitment process also lost the code of conduct | भरती प्रक्रियेलाही आचारसंहितेचा खो

भरती प्रक्रियेलाही आचारसंहितेचा खो

Next

कल्याण : परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० बस चालकांविना धूळखात पडल्याने केडीएमटी प्रशासनाकडून भरती प्रक्रिया सुरू केली जाणार होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना तिला विधानपरिषदेच्या निवडणूक आचारसंहितेचा फटका बसला आहे. परिणामी, भरती प्रक्रिया पूर्ण होऊन बस मार्गावर धावण्यास आणखी विलंब होणार आहे. दरम्यान, यासंदर्भात परिवहन सभापती भाऊसाहेब चौधरी लवकरच महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेणार आहेत.
जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत केडीएमटी उपक्रमाला १८५ बस मिळणार आहेत. यातील १० व्होल्वो आणि उर्वरित ६० बस आॅगस्ट २०१५ मध्ये दाखल झाल्या आहेत. व्होल्वो बस रस्त्यावर धावत आहेत, परंतु चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे ६० बस वापराविना धूळखात पडल्या आहेत. त्यातील काहींचा आलटूनपालटून वापर केला जात आहे. पुरेशा बस असूनहीचालकाविना नागरिकांना सेवेचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव आहे.
उर्वरित ११५ बसनाही मंजुरी मिळाली आहे, परंतु निधीअभावी त्या अजूनही दाखल झालेल्या नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. याकडे लक्ष वेधताना मध्यंतरी मनसेचे माजी सभापती राजेश कदम यांनी ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला होता. एकीकडे स्मार्ट सिटीचे दिवास्वप्न दाखवले जात असताना दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे परिवहन उपक्रमाकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. परिवहन सदस्यांनीही कर्मचारीभरतीचा विषय सातत्याने लावून धरला होता. या पार्श्वभूमीवर महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन सभापती, सदस्य आणि
अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत तातडीने ठोक पगारीतत्त्वावर वाहक आणि चालक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर प्रशासनाकडून आॅनलाइन भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार होती. यासंदर्भात एजन्सी नेमली जाणार होती. परंतु,निवडणूक आचारसंहितेचा फटका याला बसल्याने तूर्तास या प्रक्रियेला ‘खो’ बसला आहे.
एकीकडे आचारसंहितेमुळे महापालिकेच्या महासभा आणि स्थायी समिती, परिवहन समिती व इतर समित्यांच्या बैठकाही रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी, पावसाळा तोंडावर आल्याने कचरा सफाई, नालेसफाई तसेच अर्धवट राहिलेली रस्त्याची कामे कधी पूर्ण करायची, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The recruitment process also lost the code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.