केडीएमसी शाळांतील सुरक्षारक्षकांची फेरनेमणूक; स्थायी समितीची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:21 PM2019-11-22T23:21:20+5:302019-11-22T23:21:27+5:30
सहा महिन्यांची मुदतवाढ; पंपगृहांनाही सुरक्षाकवच पुरवण्याचे आदेश
कल्याण : केडीएमसी शाळांच्या रक्षणासाठी नेमलेल्या सुरक्षा मंडळाच्या सुरक्षारक्षकांच्या फेरनेमणुकीला शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. सहा महिन्यांची मुदतवाढ त्यांना देण्यात आली आहे. दरम्यान, वापराविना आणि डागडुजीविना पडीक असलेल्या वास्तूंमध्ये सुरू असलेले अनैतिक प्रकार पाहता तेथेही सुरक्षारक्षक नेमावेत, अशी मागणी भाजप सदस्य संदीप पुराणिक यांनी यावेळी केली. याकडे लक्ष वेधताना पाणीवितरणच्या ठिकाणी असलेल्या संपपंपलाही सुरक्षा पुरवावी, असे आदेश सभापती दीपेश म्हात्रे यांनी उपायुक्त मारुती खोडके यांना दिले.
केडीएमसीने शाळांच्या रक्षणासाठी व शाळेच्या वेळेव्यतिरिक्त सार्वजनिक सुटीच्या दिवशी समाजकंटकांकडून शाळेचा होत असलेला गैरवापर व शाळेत होत असलेली चोरी व विघातक कृत्ये रोखण्यासाठी शाळांमध्ये सुरक्षारक्षक नेमले आहेत. महापालिकेच्या ५९ शाळा असून, तेथे ४४ सुरक्षारक्षक आणि दोन सुपरवायझर आहेत. स्थायी समितीने त्यांना ११ जुलैला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. ती मुदत संपल्याने आता त्यांना २ आॅक्टोबर २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या सुरक्षारक्षक आणि सुपरवायझरवर वेतनाच्या खर्चापोटी सहा महिन्यांत ६७ लाख २२ हजार ७६ रुपये खर्च करण्यात येणार असून त्यालाही मान्यता देण्यात आली. सुरक्षारक्षकांना मासिक वेतन २४ हजार २८५ तर सुपरवायझरला २५ हजार ९०३ रुपये वेतन मिळते.
दरम्यान, प्रस्तावावर चर्चा सुरू असताना पुराणिक यांनी डागडुजीविना खितपत पडलेल्या सूतिकागृहाच्या अवस्थेकडे लक्ष वेधले. काही वर्षांपासून ही वास्तू बंद आहे. अशा अनेक वास्तू बंद असून, तेथे अनैतिक प्रकार घडत असल्याने त्या वास्तूंनाही सुरक्षा पुरवा, अशी मागणी पुराणिक यांनी सभापतींकडे केली.
मोहने उदंचन केंद्राद्वारे उल्हास नदीतून १४७ दशलक्ष लीटर प्रतिदिन पाणी उचलून बारावे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शुद्ध करून कल्याण पूर्व व पश्चिमेला वितरित केले जाते. दरम्यान, २६ जुलै २०१९ ला अतिवृष्टीमुळे उल्हास नदीला पूर आला होता. त्यामुळे मोठा स्फोट होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. पाहणी केली असता १२५० के.व्ही.ए. क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला होता. त्यावेळी दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरमधून विद्युतपुरवठा व पंपिंग सुरू करण्यात आले होते.
सध्या मोहने उदंचन केंद्रामध्ये पर्यायी ट्रान्सफॉर्मर नाही. त्यामुळे सध्या चालू असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यास पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नादुरुस्त झालेला ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करणे आवश्यक असल्याने तो दुरुस्तीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी नऊ लाख ८७ हजार ८४० रुपये खर्च अपेक्षित असल्याने त्यासंदर्भातला प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडून मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर मांडण्यात आला होता. त्याचबरोबर महावितरण कंपनीच्या गोवेली सबस्टेशनमधून टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रास वीजपुरवठा होणाºया भूमिगत केबलच्या दुरुस्ती खर्चालाही मान्यता देण्यात आली.
दहा मिनिटांतच सर्व प्रस्ताव मंजूर
स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारच्या मागील सभांचे इतिवृत्त कायम करण्यासह एकूण ११ प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. सभा २.१५ च्या आसपास सुरू झाली, परंतु पुढील १० मिनिटांतच सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
सचिव संजय जाधव प्रस्ताव वाचत होते तर सदस्यांकडून मात्र चर्चा करण्याऐवजी फक्त मंजूर असेच बोलले जात होते.
केवळ सुरक्षारक्षकांच्या फेरनेमणुकीच्या प्रस्तावावर सदस्य संदीप पुराणिक यांच्याकडूनच चर्चा करण्यात आली. परंतु, तीही फार वेळ चालली नाही.