ठामपाचे ‘त्या’ जाहिरात कंपनीसाठी रेड कार्पेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 11:26 PM2020-12-30T23:26:41+5:302020-12-30T23:26:46+5:30
१.२० कोटी देण्याचा प्रस्ताव : वाघुले यांचा आक्षेप
ठाणे : अहमदाबाद मनपा क्षेत्रातील जाहिरात फलकांच्या सर्वेक्षणाबरोबरच महसूलवाढीत अपयशी ठरलेल्या एका जाहिरात कंपनीला ठाणे मनपाने रेड कार्पेट अंथरले आहे. अहमदाबाद मनपाने ५० नोटीस बजाविल्याने बदनाम झालेल्या या कंपनीला १५ वर्षांच्या काळात दरवर्षी एक कोटी २० लाख रुपये देण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला भाजपचे ठामपातील गटनेते संजय वाघुले यांनी आक्षेप घेऊन अहमदाबाद मनपाकडून सत्यस्थिती जाणून घेण्याची विनंती ठाणे मनपा आयुक्तांना केली आहे.
जाहिरात विभागाचे संपूर्ण काम ऑनलाइन, जाहिरात फलकांच्या परवानगीसाठी संगणक प्रणाली आणि नियमित सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे काम एका जाहिरात कंपनीला देण्याचा प्रस्ताव ठामपाने तयार केला आहे. अहमदाबाद मनपाचे उत्पन्न चार वर्षांत १४८ कोटी ७८ लाखांवर पोचल्याचा कंत्राटदाराने केलेला दावा ठामपाने मान्य केला आहे.
त्यानुसार या कंपनीला पीपीपी तत्त्वानुसार काम सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी १५ लाख रुपये, ऑनलाइन संगणक प्रणाली तयार केल्यानंतर १० लाख आणि दरमहा देखरेख व अहवालांसाठी दरमहा १० लाख आणि पुढील १५ वर्षांसाठी प्रति वर्षी ५ टक्के वाढीने रक्कम दिली जाईल. त्याचबरोबर वाढलेल्या महसुलाच्या रकमेवर प्रतिवर्षी १० टक्के वाढीव रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. या कंपनीला मनपाकडून ५०० चौरस फूट जागाही १५ वर्षांसाठी दिली जाणार आहे. या प्रस्तावानुसार संबंधित कंपनीच्या तिजोरीत वार्षिक किमान एक कोटी २० लाख रुपये जमा होणार आहेत.
अहमदाबाद मनपाने या कंपनीला कामात कसूर केल्याबद्दल ५० वेळा कारणे दाखवा तर ८ वेळा दंड ठोठावण्याच्या नोटीस दिल्या. संबंधित कंपनीमुळे अहमदाबाद मनपाच्या जाहिरातीच्या उत्पन्नात कोणतीही वाढ झालेली नाही. चार वर्षांत अहमदाबाद मनपाने त्या कंपनीला एक कोटी ६४ लाख ४७ हजार ८५५ रुपये प्रदान केल्याचे वाघुले यांनी स्पष्ट केले आहे.