कोरोना रुग्णांना रेड रेसेन्ट सोसायटीची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 11:58 PM2021-04-23T23:58:12+5:302021-04-23T23:58:28+5:30
होम क्वारंटाइन बाधितांना मोफत सिलिंडर
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : राज्यात एकीकडे ऑक्सिजन पुरवठ्याची टंचाई असल्याने कोरोना रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी धावपळ होत आहे. अशातच भिवंडीतील होम क्वारंटाइन झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करून रुग्णांना दिलासा देण्याचे काम रेड रेसेन्ट सोसायटी करीत आहेत.
मुंबई येथील रेड रिसेन्ट सोसायटी या संस्थेच्यावतीने सोसायटी सदस्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहाराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी गरजू कोरोना रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मोफत देऊन त्यांना दिलासा दिला आहे. राज्यात कोरोना रुग्णांना आणि रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे आणि त्याअभावी कित्येक रुग्णांना आपला जीवही गमवावा लागला आहे. यामुळे रेड रिसेन्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने मुंबई आणि जवळच्या शहरांमधील जे कोरोना रुग्ण घरी उपचार घेत आहेत आणि त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, अशा रुग्णांसाठी एक हजार ऑक्सिजन सिलिंडरची मदत करण्यात येत आहे. त्यानुसार या संस्थेच्या भिवंडीतील सदस्या कांबळे आणि ‘सोसायटीचे अध्यक्ष अर्शद सिद्दिकी यांनी भिवंडी शहरातील गृहविलगीकरणातील रुग्णांना १०० ऑक्सिजन सिलिंडरची मदत केली.
सध्या रुग्णांच्या वाढत्या संख्येने रुग्णालयात बेड, ऑक्सिजनही मिळत नाही. त्यामुळे काही रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. परंतु त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता असते, अशा रुग्णांना या मोफत घरपोच मिळणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरमुळे मोठा दिलासा मिळत आहे.
रात्री अचानक ऑक्सिजन सिलिंडरची गरज लागली तेव्हा मी व्हाॅट्सॲपवर आलेल्या मेसेजनुसार कांबळे यांना रात्री ११ वाजता फोन केला आणि त्यांनी मला लगेचच घरपोच सिलिंडर पाठवला, अशी प्रतिक्रिया एका रुग्णाने दिली.
‘समाधान मिळाले’
आम्ही ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, अशा होम क्वारंटाईन रुग्णांना घरपोच ऑक्सिजन सिलिंडरची मदत करत आहोत. तो संपल्यावर पुन्हा भरूनही देणार आहोत. या कार्यामुळे आम्हाला समाधान मिळत आहे, अशी प्रतिक्रिया रेड रिसेन्ट सोसायटीच्या सदस्या स्वाती कांबळे यांनी दिली आहे.