रासायनिक सांडपाण्याच्या पाइपलाइनला रेड सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:52 PM2020-02-26T23:52:35+5:302020-02-26T23:52:43+5:30
बंदिस्तीकरणाचे काम रखडलेलेच; रेल्वेच्या परवानगीची प्रतीक्षा; एमआयडीसीकडून पाइप मागवण्याची प्रक्रिया सुरू
- मुरलीधर भवार
कल्याण : डोंबिवलीतील रासायनिक कंपन्यांतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्रात (सीईटीपी) प्रक्रिया केल्यावर ते पाणी दूरवर खाडीत सोडण्यासाठी बंदिस्त पाइपलाइन टाकण्यास रेल्वेने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या कामासाठी एमआयडीसीने पाइप मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, रेल्वेच्या परवानगीअभावी हे काम रखडण्याची शक्यता आहे. प्रदूषणाची समस्या लवकरात लवकर सुटावी, यासाठी त्याला रेल्वेने तातडीने परवानगी द्यावी, अशी अपेक्षा एमआयडीसीकडून व्यक्त होत आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांतून निर्माण होणाºया रासायनिक सांडपाण्यावर फेज-१ व फेज-२ मधील सीईटीपीमध्ये प्रक्रिया केली जाते. पर्यावरणाच्या निकषांप्रमाणे प्रक्रिया केलेले सांडपाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे दूरवर खाडीत सोडणे बंधनकारक आहे. हा विषय पाच वर्षे चर्चिला जात आहे. हे काम एमआयडीसीने करणे अपेक्षित आहे. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरानजीक फेज-१ मधील सीईटीपी केंद्र आहे. या केंद्रापासून ते ठाकुर्ली म्हसोबा मंदिर चौकापर्यंत दीड किलोमीटरपर्यंत बंदिस्त पाइपलाइन टाकण्याचे काम एमआयडीसीने पूर्ण केले आहे. मात्र, या पाइपलाइनमधून प्रक्रिया केलेले सांडपाणी वाहून नेत नाही. कारण, त्याचे पुढील काम अद्याप बाकी आहे. प्रक्रिया केंद्रापासून पुढे सात किलोमीटर दूरवर खाडीत प्रक्रिया केलेले सांडपाणी सोडणे बंधनकारक आहे. प्रक्रिया केंद्रापासून ते ठाकुर्लीपर्यंत रेल्वेमार्गाच्या खालून खंबाळपाडा नाला वाहतो आहे. या नाल्यातून प्रक्रिया केलेले सांडपाणी वाहून नेले जाते. ज्या नाल्यातून रासायनिक सांडपाणी वाहून नेले जाते, तो नाला उघडा आहे. त्यामुळे ठाकुर्ली, खंबाळपाडा परिसरातील नागरिकांना रासायनिक सांडपाण्याच्या उग्र दर्पाचा त्रास सहन करावा लागतो. हे सांडपाणी बंदिस्त पाइपद्वारे वाहून नेल्यास रासायनिक पाण्याच्या उग्र वासापासून नागरिकांची सुटका होऊ शकते. सात किमीपर्यंत बंदिस्त पाइपलाइन टाकण्यासाठी रेल्वेच्या परवानगीचा अडसर आला आहे. ठाकुर्ली म्हसोबा मंदिरनजीक खंबाळपाडा नाला हा रेल्वेमार्गाखालून वाहतो. त्याखालून बंदिस्त पाइपलाइन टाकण्यासाठी रेल्वेकडे परवानगी मागितली आहे. मात्र, ती अद्याप रेल्वेने दिलेली नाही.
बंदिस्त पाइपलाइन टाकण्याच्या कामावर ८० कोटी खर्च केले जाणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाइप मागविण्याची प्रक्रिया एमआयडीसीने सुरू केली आहे. रेल्वेमार्गाखालून वाहत जाणारा खंबाळपाडा नाला पुढे खाडीस मिळतो. पुढे खाडीत पाइपलाइन टाकण्यासाठी सागरी विभागाची परवानगी व पर्यावरण विभागाचा ना-हरकत दाखलाही या कामाला मिळाला आहे. तर, काही भाग हा सीआरझेडमध्ये असल्याने त्याचीही परवानगी मिळाली आहे.
...तर भाजीपाल्याच्या शेतीलाही बसेल आळा
बंदिस्त पाइपलाइनद्वारे हे रासायनिक सांडपाणी दूरवर खाडीत सोडल्यास ठाकुर्लीनजीक रेल्वेच्या जागेत प्रदूषित पाण्यावर पिकवल्या जाणाºया भाजीपाल्याची शेतीलाही आळा बसण्यास मदत होऊ शकते.
रेल्वेकडून अनेक प्रकरणांत परवानग्या देण्यास विलंब केला जातो. त्यामुळे प्रदूषणासारख्या महत्त्वाच्या विषयावरही परवानगी रखडून ठेवणे कितपत योग्य आहे, असा सवाल प्रदूषित पाण्याच्या उग्र त्रासाने त्रस्त असलेल्या नागरिकांकडून केला जात आहे.