भिवंडीतील शेतात बहरली लालभडक स्ट्रॉबेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 12:00 AM2021-03-02T00:00:29+5:302021-03-02T00:00:36+5:30
कुंदन पाटील यांच्या अभिनव प्रयत्नांना यश
नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील शेती म्हणजे फक्त पावसाळी भातशेतीचे पीक. त्यात ही सध्या तालुक्यात आलेले गोदाम व रिअल इस्टेटच्या व्यवसायामुळे भातशेती नष्ट होत असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती कुंदन पाटील यांनी वालकस येथील आपल्या शेतात चक्क महाबळेश्वर येथे पिकविल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. विशेष म्हणजे तिला आता मधुर आणि लालभडक फळे आली असून, या मधुर फळांची गोडी सध्या पाटील चाखत आहेत.
दापोडे येथील मूळचे शेतकरी असलेले कुंदन पाटील यांचे वडील कै. तुळशीराम पाटील यांनी परिसरात गोदामांचा व्यवसाय वाढला असल्याने पडघानजीकच्या वालकस या गावात सात एकर शेतजमीन खरेदी करून तेथे शेतीची आपली परंपरा सुरू ठेवली होती. या शेतजमिनीत त्यांनी ठिबक सिंचनच्या माध्यमातून पांढरा कांदा, कलिंगड, टरबूज, भेंडी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, सिमला मिर्ची, बटाटा, झेंडू आदींची लागवड केली आहे.
अशातच महाबळेश्वरच्या मित्राच्या सल्ल्याने त्यांनी एक हजार स्ट्रॉबेरीची रोपे मागवून त्यांची लागवड डिसेंबरच्या सुरुवातीला केली होती. मशागत करून योग्य ती काळजी घेतल्याने रोपट्यांना आता फळे आली असून, आता ती चांगलीच बहरली आहेत.
मी मूळचा शेतकरी कुटुंबातील असल्याने शेती स्वस्थ बसू देत नव्हती, त्यामुळे या शेतजमिनीत विविध प्रयोग करीत विविध भाजीपाल्याची लागवड केली. दररोज सकाळी सात ते नऊ वाजेदरम्यान मी स्वतः मशागत करीत असल्याने वेगळा आनंद मिळतो, अशी भावना पाटील यांनी व्यक्त
केली.
त्यांच्या या प्रयत्नांची माहिती समजल्यावर त्यांच्या शेतास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या.