पुनर्विकासाचा आराखडा तयार

By admin | Published: May 2, 2017 02:22 AM2017-05-02T02:22:26+5:302017-05-02T02:22:45+5:30

युती सरकारने मुंबईमध्ये क्लस्टर योजना यशस्वी केल्याचा दावा करीत या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील जुन्या इमारतींच्या पुर्नविकासाचा

Redevelopment Plan | पुनर्विकासाचा आराखडा तयार

पुनर्विकासाचा आराखडा तयार

Next

भार्इंदर : युती सरकारने मुंबईमध्ये क्लस्टर योजना यशस्वी केल्याचा दावा करीत या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील जुन्या इमारतींच्या पुर्नविकासाचा आराखडा तयार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश
मेहता यांनी रविवारी दिली. या
योजनेत मीरा-भार्इंदरसह उल्हासनगर, भिवंडी आदी शहरांचा समावेश करण्यात येणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. मीरा-भार्इंदर पालिकेने सेंट्रल पार्क येथे आयोजित केलेल्या नवीन नळजोडणी लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. युती सरकारची इच्छाशक्ती प्रबळ असल्यानेच चांगली कामे होत असल्याचा दावा मेहता यांनी केला.
२०१५ मध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे शहराला ७५ दशलक्ष लीटर जादा पाणीपुरवठा केला जात असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. ही योजना पालिकेने मुदतीपूर्वी पूर्ण केल्याने त्यातील २५ दशलक्ष लीटर पाणी तातडीने दिल्याचे त्यांनी सांगितले.
मीरा-भार्इंदरला सूर्या धरणातील २१८ दशलक्ष लीटर पाणी  मिळण्यास सुरुवात होणार असून त्यासाठी राज्य सरकारने १९००
कोटींचा निधी उपलब्ध दिला आहे. यामुळे येत्या अडीच वर्षांत मीरा भार्इंदरचा पाणीप्रश्न सुटेल आणि पुढची २५ वर्षे २४ तास पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा दावा त्यांनी केला.
पाण्याच्या कोट्यात वाढ होत नसली तरी लोकसंख्येत मात्र वाढ होत असल्याने लोकांची तहान भागविण्यासाठी नवीन धरणे बांधण्याचा राज्य सरकार विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी प्रास्तविकात नवीन नळजोडणी केवळ आॅनलाईन पद्धतीनेच दिली जाईल, असे स्पष्ट केले. त्यासाठी दलाल व मध्यस्थांच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. २५ दशलक्ष लीटर पाण्यापैकी रविवारी २३ दशलक्ष लीटर पाणी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते आॅनलाईन प्रक्रियेतील अर्जाची प्रत संगणकावरुन काढण्यात आली. आॅनलाईन कार्यप्रणालीचा शुभारंभ झाल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आणि शहरातील सहा लाभार्थी गृहसंकुलांना अर्जांच्या प्रतिकृतीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान महापौर गीता जैन
यांनी नागरिकांना ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे आवाहन केले. त्याच्या पत्रकाचे प्रकाशनही करण्यात आले.
यावेळी त्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे शहराला ७५ ऐवजी १०० दशलक्ष लीटर जादा पाणी देण्याची मागणी केली. त्यावर जलसंपदा मंत्र्यांनी त्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले.
यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. संजय राऊत, खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक, आ. नरेंद्र मेहता यांची भाषणेही झाली.
याप्रसंगी आ. रवींद्र फाटक, उपमहापौर प्रवीण पाटील, स्थायी सभापती प्रभाकर म्हात्रे, पालिकेचे शहर
उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, डॉ. संभाजी पानपट्टे, दीपक पुजारी, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे, दीपक खांबित आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

अधिकारी सुटाबुटात
कार्यक्रमात शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांचा मोठ्याप्रमाणात भरणा, तर नागरिकांची उपस्थिती बेताची होती. तसेच आयुक्तांनी पालिकेतील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना कार्यक्रमाला हजर राहणे बंधनकारक केल्याने सर्वांनी आपण हजर राहिल्याची नोंद हजेरी पुस्तकात केली. तसेच कार्यक्रमाला सुट घालण्याची सुचना आयुक्तांनी केल्याने बहुतांशी अधिकारी व कर्मचारी सुटाबुटात हजर होते.

Web Title: Redevelopment Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.