लालपरी असुरक्षित; अग्निशमन यंत्र गायब; ठाण्यातील तीन एसटी डेपाेंमध्ये पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 11:43 PM2021-02-20T23:43:49+5:302021-02-20T23:43:56+5:30

ठाण्यातील तीन एसटी डेपाेंमध्ये पाहणी : फर्स्ट एड बाॅक्स निव्वळ नावाला; औषधांचा पत्ताच नाही

Redhead insecure; Fire extinguisher disappears | लालपरी असुरक्षित; अग्निशमन यंत्र गायब; ठाण्यातील तीन एसटी डेपाेंमध्ये पाहणी

लालपरी असुरक्षित; अग्निशमन यंत्र गायब; ठाण्यातील तीन एसटी डेपाेंमध्ये पाहणी

Next

अजित मांडके

ठाणे : गेल्या काही दिवसांत राज्याच्या काही भागांत एसटीला आग लागल्याच्या किंवा आग लावण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने ठाण्यातील एसटीच्या तीन मुख्य डेपोंमध्ये जाऊन याची चाचपणी केली असता लालपरीची अवस्था दयनीय झाली आहे. शिवशाही बस वगळल्या, तर एसटीच्या एकाही लालपरीत अग्निशमनयंत्र नसल्याचे दिसले. तसेच फस्ट एड बॉक्सही निव्वळ नावापुरते असून, त्यात प्रथमोपचाराचे एकही औषध नव्हते. त्यामुळे लालपरी ही असुरक्षित असल्याचे पाहणीत आढळले.

एसटीची सेवा ही  महत्त्वाची मानली जाते. त्यांची अवस्था सुधारण्यासाठी किंवा प्रवासी वाढविण्यासाठी उपाय केले; परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचेच दिसून आले आहे. त्यातही मागील काही दिवसांत एसटीला आग लागण्याच्या किंवा आग लावण्याच्या घटना वाढताना दिसल्या. असे असूनही ठाण्यातील एसटीमध्ये कुठेही त्या दृष्टिकोनातून सतर्कतेचे उपाय केले नसल्याचेच दिसून आले.

अग्निशमन यंत्रणा गायब
एसटीच्या एकाही लालपरीत अग्निशमन यंत्रणा नसल्याचेच दिसून आले. ते ठेवण्यासाठी खास जागा केली आहे; परंतु त्यात यंत्रच नसल्याचे दिसले. एसटीच्या सर्व लालपरींमध्ये हीच अवस्था असल्याची माहिती एसटी चालक व वाहकांनी दिली.

वायफाय यंत्रणा गायब
काही वर्षांपूर्वी एसटीचे प्रवासी वाढावेत म्हणून वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती; परंतु आता ही सेवा इतिहासजमा झाल्याचे वाहक व चालक सांगत आहेत. काही महिने ही सुविधा सुरू होती. त्यानंतर एसटीमधील ही यंत्रणाच गायब झाली आहे.
 

आगारात ‘आओ जाओ घर तुम्हारा’
एसटीच्या खोपट, वंदना आणि ठाणे स्टेशन येथील आगारात ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच अवस्था आहे. या तीनही ठिकाणी बाहेरची खाजगी वाहनेदेखील आत उभी केल्याचे दिसत होते. यात दुचाकींसह चारचाकींचा समावेश होता. कोणी कसाही येत असून, कुठेही बसत आहे. जायचे जरी नसले तरी काही जण डेपोत येऊन चकाट्या पिटताना दिसले.

फस्ट एड बॉक्स नावालाच
एखाद्या वेळेस काही दुर्घटना घडली, तर फस्ट एड बॉक्समधील प्रथोमपचाराची औषधे असणे गरजेचे असते; परंतु एसटी प्रत्येक बसमध्ये हे बॉक्स पूर्णपणे रिकामे आहेत. काही बॉक्स तर फुटलेले तर काही केवळ दोरीने बांधून ठेवल्याचे दिसले. त्यामुळे एखाद्या वेळेस काही दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Web Title: Redhead insecure; Fire extinguisher disappears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे