चेहऱ्यावरच्या मास्कने घालवली लिपस्टिकची लाली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 12:14 AM2021-05-03T00:14:35+5:302021-05-03T00:15:23+5:30
घराबाहेर पडतच नाही : कॉस्मेटिक विक्रेत्यांच्या वस्तू झाल्या खराब
सुनील घरत
पारोळ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क बंधनकारक असताना आता या मास्कमुळे महिलांच्या मेकअपवर गदा आली आहे. घराबाहेर पडताना मास्क लावावा लागत असल्याने या मास्कने लिपस्टिकची लाली घालवली आहे.
मेकअप हा महिलावर्गाचा आवडता विषय असून, कोणताही कार्यक्रम असो वा खरेदीसाठी बाहेर पडायचे असो, मेकअप हा हवाच. याशिवाय उंबरा ओलांडला जातच नाही, अशी अनेक महिलांची स्थिती असते. या मेकअपमध्ये ओठांना लावण्यात येणाऱ्या लिपस्टिकचे खूपच महत्त्व आहे. वेगवेगळ्या रंगाचा लिपस्टिक आज बाजारात उपलब्ध आहेत. खरेदी करताना महिला याबाबत चर्चाही करतात, पण गेल्या वर्षभरात कोरोनाने या लिपस्टिकची लाली घालवली आहे. कोरोना प्रादुर्भावात बाहेर पडता येत नाही. पडले तर मास्क लावावा लावतो. त्यामुळे लिपस्टिक लावून उपयोग नाही, अशी स्थिती आज महिलावर्गाची झाली आहे.
दुसरीकडे लग्नसराई, समारंभ, कार्यक्रम यावेळी विशेष प्रकारचा मेकअप महिला करतात, पण वर्षभरापासून तेही बंद आहेत. लॉकडाऊनमध्ये सण-उत्सवही घरच्या घरीच साधेपणाने साजरे करावे लागत आहेत. यामुळे मेकअपचा विषय आता संपुष्टात आला आहे.
२४ तास घरातच,
ब्युटीपार्लर हवे कशाला?
कोरोना काळात अनेकांचे कामधंदे गेले आहेत तसेच काहींच्या नोकऱ्याही गेल्या आहेत, तर काही जण नोकरीत महिन्याचे काही दिवसच काम कमी असल्याने पगारही कमी झाले आहेत. अशातच महागाई वाढल्याने घर चालवणे कठीण झाले आहे. तसेच कोरोना काळात औषधांचेही खर्च वाढले आहेत. अशात
आपण घरीच असल्याने पार्लरचा खर्च
कश्याला, असे मत महिलांचे आहे.
वस्तू फेकाव्या लागणार
कोरोना सुरू झाल्यापासून सौंदर्य प्रसाधनाकडे महिलांनी पाठ फिरवली आहे. तसेच लॉकडाऊनमध्ये दुकान बंद राहिल्याने आम्हाला भाडे, वीजबिल भरावे कसे हा प्रश्न असतानाच आता दुकानातील वस्तूंची मुदत संपत आल्याने तो माल फेकून द्यावा लागणार आहे.
- मयूर पारीख,
सौंदर्य प्रसाधन विक्रेता
कोरोनामुळे घराबाहेर पडणे बंद आहे. घरगुती वस्तू खरेदीसाठी जावे लागते तेही मास्क लावून. मग उगाचच लिपस्टिक व इतर वस्तू वापरायच्या कशाला? उगीच खर्च कशाला? -अर्चना पाटील, वसई
मागील वर्षांपासून बाहेर जाताना मास्कचा वापर आम्ही करत आहे. आमच्या घरात बाहेर जाताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे उगाचच या सौंदर्यप्रसाधने वापरायची कशाला, वर्षभरात आम्ही ती खरेदीही केली नाहीत. - सपना जाधव, वसई