मास्कने घालवली लिपस्टिकची लाली; मेकअपचे प्रमाण झाले कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 11:28 PM2021-04-30T23:28:19+5:302021-04-30T23:28:36+5:30
मेकअपचे प्रमाण झाले कमी : कॉस्मेटिक विक्रेते, ब्युटी पार्लर यांचा व्यवसाय बुडाला
स्नेहा पावसकर
ठाणे: गेल्यावर्षी कोरोना आला आणि मास्क जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला. आपल्या प्रत्येकाच्या जवळपास अर्ध्या चेहऱ्यावर मास्क चढलेला असतो. या मास्कमुळे विशेषत: महिला वर्गाच्या मेकअपवर परिणाम झालेला पाहायला मिळाला आहे. एखाद्या सण, सोहळ्याशिवाय महिलांचे मेकअप करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे साहजिकच कॉस्मेटिक विक्रेते, ब्युटी पार्लर यांचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे.
कुठेही बाहेर जायचे म्हटले की मेकअप, सजणे या महिलांच्या आवडीच्या गोष्टी. मग मेकअप, हेअरस्टाइल या सगळ्या गोष्टी आल्याच. मेकअपमधली प्रत्येक नवीन गोष्ट घेण्याकडे महिलांचा कल असतो; मात्र गेल्या मार्चपासून लॉकडाऊनमुळे बहुतांशजण घरात बसले. ऑफिसचे कामही घरूनच होऊ लागले. त्यात कामानिमित्त बाहेर पडायचे म्हटले तरी चेहरा मास्कने झाकत असल्यामुळे कोणीही मेकअप करण्यास फारसे उत्सुक दिसत नाही. याचा परिणाम काॅस्मेटिकच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे.
२४ तास घरात मग पार्लर हवे कशाला?
गेल्या वर्षभरात बहुतांश महिला या अधिक वेळ घरातच असतात. कुठे जायचं म्हटलं तरी चेहऱ्यावर मास्क असतो. त्यामुळे कशाला पार्लरमध्ये जाऊन पैसे घालवायचे, मेकअप करून दिसत पण नाही, या विचाराने महिला वर्गाचा मेकअप, ब्युटी पार्लरच्या वस्तूंचा वापर कमी झाला आहे.
- रिषिता साळवी,
ब्युटीपार्लर चालक
आधीच आम्हाला दुकाने सुरू ठेवायला परवानगी नाही. मध्यंतरीच्या काळात दुकाने उघडत होतो. मात्र तेव्हाही फारसा अपेक्षित व्यवसाय झाला नाही. कारण अनेकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा घरूनच कामे होत असल्याने महिला घराबाहेर कमी पडतात. त्यामुळे त्यांचे कॉस्मेटिक खरेदीचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. गेल्यावर्षीच्या घेतलेल्या वस्तूही विक्री न झाल्याने तशाच आहेत.
- विरेन कामाडी,
कॉस्मेटिक विक्रेते