ठाणे-भिवंडीतील 1 हजार 756 तक्रारींचे एकाच दिवसात निवारण, पोलिसांची विशेष मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 11:56 PM2020-12-06T23:56:33+5:302020-12-06T23:56:57+5:30
Thane News : पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने शनिवारी पश्चिम प्रादेशिक विभागात तक्रार निवारण कार्यशाळेत ठाणे, भिवंडी आणि वागळे इस्टेट या परिमंडळातील १,८६१पैकी तब्बल एक हजार ७५६ तक्रारींचा निपटारा एका दिवसात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - एखादा अर्ज अनेक दिवस पोलीस दप्तरी पडून राहतो. त्याची निर्गती होत नसल्यामुळे अर्जदारांचे समाधानही होत नाही. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने शनिवारी पश्चिम प्रादेशिक विभागात तक्रार निवारण कार्यशाळेत ठाणे, भिवंडी आणि वागळे इस्टेट या परिमंडळातील १,८६१पैकी तब्बल एक हजार ७५६ तक्रारींचा निपटारा एका दिवसात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अनेकदा एकच तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपासून ते पोलीस आयुक्त आणि थेट गृहमंत्र्यांपर्यंत जाते. एकच तक्रार वेगवेगळ्या वरिष्ठ कार्यालयांमधून पुन्हा संबंधित पोलीस ठाण्यात येत असल्यामुळे, त्यामध्ये पोलीस ठाण्यासह संपूर्ण यंत्रणेचा वेळ खर्ची पडतो. यात सुसूत्रता येण्यासाठी या सर्व अर्जांचे वर्गीकरण करून त्यांच्या निपटाऱ्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी अलिकडेच दिले होते.
या तक्रारींचा होता समावेश
यातील अनेक तक्रारी या जमिनीचे वाद, आर्थिक देवाण-घेवाण (फसवणूक वगळता) या दिवाणी स्वरूपाच्या होत्या. काही तक्रारी या पती-पत्नींमधील वाद, शेजाऱ्याचे वाद आणि अगदी नळावरील भांडणे अशा किरकोळ स्वरूपाच्या होत्या. अशी प्रकरणे दोन्ही बाजू समोरासमोर ऐकून ती सामोपचाराने मिटविण्यात आली.
त्यामुळेच ठाणे शहर परिमंडळात ८८५ पैकी ८१४, वागळे इस्टेट परिमंडळामध्ये ६२८ पैकी सर्वच ६२८ तर भिवंडीमध्ये ३४८ पैकी ३१४ अर्जांचे निवारण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात ठाणेनगर पोलीस ठाण्यात २०० पैकी १७५ तक्रारींचे निराकरण झाले, तर वागळे इस्टेट, कोपरी, वर्तकनगर, श्रीनगर, कापूरबावडी, कासारवडवली आणि चितळसर या पोलीस ठाण्यांनी सर्वच तक्रारींचे निवारण केले.
या तक्रार निवारण मोहिमेत भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, मुंब्रा पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात उपायुक्त डॉ.विनय राठोड, कोनगाव येथे उपायुक्त योगेश चव्हाण या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही तक्रारदारांशी संवाद साधला. इतर पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह इतर पोलीस अधिकारी हजर होते.
तक्रारी प्रलंबित राबण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळेच एकाच दिवशी ही विशेष मोहीम राबवून माझ्यासह तीन पोलीस उपायुक्तांनीही नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले. अनेक तक्रारी सामोपचाराने मिटविल्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.
- अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे