ठाणे जिल्हा रुग्णालयात अग्निरोधक यंत्रे कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 05:14 AM2018-12-20T05:14:31+5:302018-12-20T05:14:49+5:30
अंधेरीतील दुर्घटना : कळव्याच्या महापालिका रुग्णालयात पुरेशी काळजी
ठाणे : मुंबईतील अंधेरी येथील कामगार रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर ठाण्यातील महत्त्वाच्या आणि नेहमीच गजबजलेल्या ठाणे महापालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राज्य शासनाचे विठ्ठल सायन्ना जिल्हा (सामान्य) रुग्णालय येथे प्रस्तुत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत कळव्याच्या रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा पुरेशी आहे. तर, जिल्हा रुग्णालयात त्याची कमतरता दिसून आली. मात्र, अंधेरीतील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही रुग्णालयांतील प्रशासनाकडून काळजी घेण्यात येणार असल्याचा दावा ‘लोकमत’कडे करण्यात आला.
जिल्हा रुग्णालयात कमतरता
ब्रिटिशकालीन जिल्ह्याच्या विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य (शासकीय) रुग्णालयात ठाणे व पालघर या जिल्ह्यांतून वाडा, मोखाडा, जव्हार, पालघर, कर्जत, कसारा आदी या ग्रामीण आणि आजूबाजूच्या परिसरांतून दिवसाला सुमारे १२०० ते १५०० रुग्ण येतात. गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून या रुग्णालयाची ओळख आहे. या रुग्णालयात एकूण १९ वॉर्ड आहेत. पाच जुन्या इमारतींसह अपघात विभागाचा तसेच इतर दोन ते तीन इमारतींत रुग्णालयाचे कामकाज सुरू आहे. येथील काही इमारती दोन आणि तीन मजली आहेत. तसेच हे रुग्णालय स्थलांतराच्या वाटेवर आहे. या रुग्णालयात काहीच ठिकाणी अग्निरोधक यंत्र असल्याचे पाहण्यास मिळाले. रुग्णालयाच्या तुलनेत अग्निरोधक यंत्रांची कमतरता असल्याचे दिसून आले.
यंदा जानेवारीत, रुग्णालयाच्या आवारातील भंगारात काढलेल्या गाड्यांना रविवारी दुपारी अचानक आग लागली. यावेळी चार गाड्या जळून खाक झाल्या. त्यानंतर, रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणेचे फायर आॅडिट केल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
कळवा रुग्णालयात पुरेशी यंत्रे, दररोज सुमारे १६०० ते १७०० रुग्ण
कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातही ठाणे ग्रामीण भागांमधील शहापूर, मुरबाड आणि पालघर जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. दररोज सुमारे १६०० ते १७०० रुग्ण येतात. ही संख्या ग्रामीण रुग्णालयापेक्षा जास्त आहे. हे रुग्णालय तीन मजली असून त्याची क्षमता ५०० बेड इतकी आहे. त्याला संलग्न वैद्यकीय महाविद्यालय आहे. रुग्णालय आवारात फेरफटका मारला असता प्रत्येक ठिकाणी अग्निरोधक यंत्र पाहण्यास मिळत असून त्याचेही नूतनीकरण केल्याचे दिसते.
रुग्णालयातील फायर सिस्टीमबाबत आॅडिट करण्यात आले. तसेच संबंधित यंत्रणेबाबत एनओसी घेतलेली आहे. तसेच अग्निरोधक यंत्रांचे नूतनीकरण केले. जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात आॅडिट केले आहे की नाही, याची चाचपणी करण्यास सांगितले आहे. काही अग्निरोधक यंत्र-यंत्रणेची गरज असून त्याच्या खरेदीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
आगीसंदर्भात रुग्णालयात अलीकडेच मॉकड्रील करून येथील यंत्रणा किती सज्ज आहे, याची चाचपणी केली होती. तसेच आग लागल्यावर काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत येथील क र्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. मुंबईतील घटनेत, रुग्ण घाबरल्याचे दिसते. अशा घटना घडल्यास रुग्णांना सुरक्षित बाहेर नेण्यासाठी रुग्णालयातील दरवाजे सुस्थितीत आहेत की नाही, याचीही चाचपणी केली जाते. येथील यंत्रणा सुसज्ज आहे.
- डॉ. संध्या खडसे, अधिष्ठाता, कळवा, ठामपा