मालमत्ता कर कमी करा, अन्यथा आंदोलन; मनसेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 03:57 AM2018-09-19T03:57:26+5:302018-09-19T03:57:48+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसेचे पत्र
कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत मोकळया भूखंडावरील (ओपन लॅण्ड टॅक्स) कर कमी करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात पार पडलेल्या महासभेत घेतला गेला असतानाही नागरिकांवर लादलेला वाढीव मालमत्ता कर त्वरित कमी करावा अन्यथा रस्त्यावरील आंदोलन व न्यायालयीन लढ्याचा दुहेरी मार्ग अवलंबिला जाईल, असा इशारा कल्याण शहर मनसेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात देण्यात आला आहे.
मोकळ््या भूखंडावरील कर कमी करण्याचा निर्णय हा बिल्डर हिताचा असल्याने सामान्य करदात्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. १९८३ ते १९९५ या प्रशासकीय राजवटीत ४८ टक्के मालमत्ता कर आकारला जात होता. मात्र २००५ मध्ये विविध विकास कामांसाठी निधी देण्याकरीता राज्य सरकारने कर वाढविण्याची अट ठेवली होती. त्यावेळी दोनदा मालमत्ता कर वाढविला गेला होता. याकडे मनसेने लक्ष वेधले आहे. दरम्यान निधीतील विकासकामे पूर्ण झाली असल्याने मालमत्ता कर कमी करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे, असे मनसेचे उपाध्यक्ष अशोक (काका) मांडले, सरचिटणीस आणि माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह इरफान शेख, उल्हास भोईर, कौस्तुभ देसाई, कैलास पनवेलकर, महेश मोरे आदी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
नागरिकांसाठी का नाही?
मालमत्ता करात वाढ करण्यात आली, परंतु करदात्यांच्या बाबतीत सोयी-सुविधांची वानवाच आहे. बिल्डरांसाठी उत्साह दाखविणारी मंडळी करदात्या नागरिकांचा कर कमी करण्यासाठी उत्साह का दाखवित नाहीत, असा सवाल मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी केला.