मंदीच्या खाईतील उद्योगांना पायघड्या, परवानाशुल्कासह साठापरवाना शुल्कात कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 01:23 AM2019-11-15T01:23:27+5:302019-11-15T01:24:14+5:30
राज्यातील अनेक उद्योगधंद्यांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत असून ठाण्यातील लघुउद्योजकही या संकटाशी झुंजत आहेत.
ठाणे : राज्यातील अनेक उद्योगधंद्यांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत असून ठाण्यातील लघुउद्योजकही या संकटाशी झुंजत आहेत. त्यामुळे आता अशा उद्योगांना सावरण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. यानुसार उद्योगधंदे व्यवसाय परवान्यात ५० टक्के आणि साठापरवाना फीमध्ये ४० टक्के शुल्क कमी करण्याचा आणि परवाना अनुषंगिक बाबींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
ठाणे महापालिकेच्या परवाना विभागाने २०१४ मध्ये परवाना शुल्क आणि साठापरवान्यात वाढ केली होती. त्यात आर्थिक मंदीचा फटकाही अनेक उद्योगांना सहन करावा लागत होता. शहरातील वागळे इस्टेट आणि पोखरण परिसरात औद्योगिक वसाहती असून येथील उद्योजकांना खड्डे, अनियमित पाणीपुरवठा, स्वच्छतागृह अशा समस्यांचाही सामना करावा लागत आहे. दरम्यान, पालिकेने वाढ केलेल्या शुल्काच्या विरोधात त्यास कोपरी फायर वर्क्स असोसिएशन, कोपरी फटाका मार्केट, औद्योगिक संघटना, ठाणे लघुउद्योग संघटना (टिसा) आणि पोखरण लोक स्मॉल स्केल औद्योगिक संघटना (प्लेसा) या संघटनांनी विरोध केला होता. यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहारही केला होता. तसेच या शुल्कवाढीविरोधात जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्त, विभागीय समन्वय समिती या सर्वांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्त, विभागीय समन्वय समिती यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना वैयक्तिक लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, जयस्वाल यांनी या प्रकरणात लक्ष घालून उद्योगधंदा व्यवसाय परवाना शुल्कात ५० टक्के तर साठापरवाना शुल्कात ४० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, परवानांतर्गत येणाºया काही बाबींमध्ये काही बदल करण्याचाही निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव येत्या मंगळवारी होणाºया महासभेत अंतिम मंजुरीसाठी ठेवला आहे. तो मंजूर झाल्यास त्याचा फायदा आर्थिक गर्तेत अडकलेल्या उद्योगांना निश्चित होईल, असे बोलले जात आहे.
>हे आहेत प्रस्तावातील मुद्दे : उद्योगधंदा आणि साठापरवानामध्ये व्यवसायाचे नाव बदल करणे किंवा कमी करणे. मालकाचे नाव बदल करणे, भागीदाराच्या नावात बदल करणे किंवा वाढ करणे, परवाना व्यवसायाच्या स्वरूपात बदल करणे, साठापरवाना क्षेत्रफळ बदल करणे, साठापरवाना कर्मचारी संख्येत बदल करणे, साठापरवाना दुय्यम प्रत अदा करणे किंवा इतर बाबी अशा सर्व बाबी परवाना अंतर्गत येतात. या अंतर्गत बाबींच्या दुरु स्तीसाठी परवाना मुदत संपण्यापूर्वी मागणी केली तर त्यासाठी परवाना वार्षिक शुल्काची २० टक्के रक्कम भरावी लागत होती. मात्र, या दुरु स्तीसाठी २० टक्के रक्कम किंवा जास्तीतजास्त पाच हजार रु पये आकारण्याची शिफारस प्रस्तावात केली आहे. परवानाशुल्काची मुदत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर अशी आहे. मात्र, आता परवानाशुल्क भरण्यात आल्याच्या तारखेपासून संपूर्ण वर्ष करण्यास मान्यता मिळावी, असेही या प्रस्तावात नमूद केले आहे.
>महापालिकेने सादर केलेले सुधारित दर
क्षेत्रफळ (चौ. फु.) जुने दर प्रचलित दर नवे प्रस्तावित दर
१ ते १०० - - १००० ५००
१०१ ते २५० २५० २००० १०००
२५१ ते ५०० ५०० ४००० २०००
५०१ ते १००० १००० ६००० ३०००
१००१ ते २५०० २००० ८००० ४०००
२५०१ ते ३५०० - - १०००० ५०००
३५०१ ते ५००० ४००० १२००० ६०००
५००१ ते ६५०० - - १६००० ८०००
६५०१ ते ८००० - - २०००० १००००
८००१ ते १०००० ८००० ३०००० १५०००
१०००० च्या पुढे १०००० ४०००० २००००