मालमत्ता कर भरण्यास नागरिकांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:04 PM2018-12-13T23:04:05+5:302018-12-13T23:04:16+5:30
महापालिका मालमत्ता कर वसुलीला अभय योजनेच्या आशेने ब्रेक लागला आहे.
उल्हासनगर : महापालिका मालमत्ता कर वसुलीला अभय योजनेच्या आशेने ब्रेक लागला आहे. नागरिकांनी अभय योजनेकडे बोट दाखवत मालमत्ता कर भरण्यास नकारघंटा दाखवल्याने कर वसुली पथक कोंडीत सापडले आहे.
उल्हासनगर पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी कर वसुलीसाठी उपायुक्त संतोष देहरकर, विकास चव्हाण, उपायुक्त संतोष जाधव व नगररचनाकार मिलिंद सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पथके तयार केली आहेत. प्रत्येक चार पथकांची १२ उपपथके वसुलीसाठी तैनात केली असून या पथकांना सुखसुविधा दिल्या आहेत. तसेच शहरभर करवसुलीची जनजागृती करण्यात येत आहे. मात्र सत्ताधारी पक्षातील साई पक्षाच्या नगरसेविका दीप्ती नावानी यांनी पक्षप्रमुख व उपमहापौर जीवन इदनानी यांच्या आदेशानुसार अभय योजनेचा प्रस्ताव आयुक्तांना दिला असून २० डिसेंबरच्या महासभेत हा प्रस्ताव घेण्यात आला आहे.
महासभेत अभय योजनेचा प्रस्ताव आल्याने नागरिक प्रस्तावाकडे बोट दाखवत कर भरण्यास नकारघंटा देत आहेत. अभय योजनेच्या आशेने करवसुलीला बे्रक लागला असून मालमत्ता करावरील दंडासह व्याजाची रक्कम माफ होणार आहे. १०० टक्के दंड व व्याज माफ करण्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. अभय योजनेसाठी सत्ताधारी पक्षातील साई पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून ओमी टीमसह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, भारिप, काँॅगे्रस, पीआरपी व मनसेने पाठिंबा दर्शविला आहे. आयुक्त अच्युत हांगे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी टप्प्याटप्प्यात अभय योजना लागू केल्याने प्रतिसाद मिळाला नाही.
१०० कोटींच्या वसुलीची शक्यता
नोटाबंदी, जीएसटीमुळे मंदी आल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांसह नागरिक देत आहेत. अभय योजनेमुळे एकूण मालमत्तेवरील व्याज व दंड १०० टक्के माफ होत असल्याच्या आशेतून नागरिक व व्यापारी कर भरण्यास प्रतिसाद देणार आहेत.
त्यामुळे मालमत्ता कर वसुली १०० कोटींपेक्षा जास्त होणार असल्याची शक्यता व्यक्त होत असून आर्थिक संकटात सापडलेल्या पालिकेला नवसंजीवनी मिळणार आहे.