उल्हासनगरातील प्रदूषणबाबत काँग्रेसचे पर्यावरण सचिवकडे साकडे, वालधुनी नदीचे प्रदूषण ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 05:02 PM2021-01-30T17:02:32+5:302021-01-30T17:03:04+5:30
Ulhasnagar : शहराला प्रदूषणातून दिलासा मिळण्यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन सादर केले.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील वाढत्या प्रदूषणाबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना निवेदन दिले. तसेच सर्वाधिक प्रदूषित वालधुनी नदी पात्रात विषारी रसायन सोडत असल्याने होत असल्याची माहिती देऊन कारवाईची मागणी केली.
उल्हासनगर ध्वनी प्रदूषणात अव्वल असतांना, वालधुनी नदी पात्रात विषारी रसायन सोडले जाते. याप्रकाराने नदीतील पाण्याच्या उग्र वास येत असून नदी किनारील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला. शहराला प्रदूषणातून दिलासा मिळण्यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन सादर केले. तसेच प्रदूषण करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करून प्रदूषणाबाबत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने उल्हासनगर, अंबरनाथ येथून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रात रासायनिक कारखाने तसेच टँकरद्वारे विषारी रसायन सोडत असल्याचें सांगण्यात आले. नदी पात्रात वारंवार विषारी रसायन सोडत असल्यावरही काहीएक कारवाई होत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले.
वालधुनी नदी पात्रात विषारी रसायन सोडल्यानंतर, नदी पात्रातील उग्र वासाने श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळणे, उलट्या होणे, डोळे दुखणे, अंगाला खाज सुटणे आदी त्रास नदी किनारील हजारो नागरिकांना होत आहे. शहरातील भरतनगर, कैलास कॉलनी,समतानगर, वडोलगाव, रेणुका सोसायटी, सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, शांतीनगर, हिराघाट आदी परिसरारील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. असे पर्यावरण विभागाच्या सचिव यांना सांगण्यात आले. असाच प्रकार सुरू राहिल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता रोहित साळवे यांनी व्यक्त केला आहे. या व्यतिरिक्त प्रतिबंधक प्लॅस्टिक पिशव्याची निर्मिती व विक्री सुरू असल्याचे साळवे यांनी सांगितले. एकूणच शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे साळवे यांचे म्हणणे आहे.
प्रदूषण मंडळाची कारवाई दिखाऊ
वालधुनी नदी पात्रात रासायनिक कारखाने प्रक्रिया न केलेले विषारी रसायन सोडत असून दर पाच मिनिटाला नदीतील पाणी रंग बदलत आहे. तसेच बाहेरून आणलेले विषारी रसायन टँकरद्वारे नदी पात्रात सोडले जात असून यापूर्वी टँकरवर गुन्हे दाखल झाले. मात्र काही वर्षांपासून प्रदूषण मंडळ, पोलीस व महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रोहित साळवे यांनी केला आहे.