रहिवाशांच्या मोर्चानंतर तीन दिवसांत ‘रिजन्सी इस्टेट’ टँकरमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:45 AM2021-08-12T04:45:01+5:302021-08-12T04:45:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : केवळ अधिकाऱ्यांच्या कानाडोळा करणाऱ्या वृत्तीमुळे आठ महिन्यांपासून रिजन्सी इस्टेट या उच्चभ्रू संकुलातील सुमारे पाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : केवळ अधिकाऱ्यांच्या कानाडोळा करणाऱ्या वृत्तीमुळे आठ महिन्यांपासून रिजन्सी इस्टेट या उच्चभ्रू संकुलातील सुमारे पाच हजार रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या गृहसंकुलाला दिवसाला ४८ टँकर पाणी मागवावे लागत होते. पाणीटंचाईच्या निषेधार्थ मागील आठवड्यात रहिवाशांनी एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला. त्याची गंभीर दखल घेत कार्यकारी अभियंते रमेश पाटील यांनी स्वतः पाहणी करून तूर्त पाणी समस्या सोडवली आहे. दिवसाला पाच लाख लिटरवरून १० लाख लिटर पाणी मिळू लागले असून, तीन दिवसांपासून हे गृहसंकुल टँकरमुक्त झाले आहे.
रहिवाशांचे प्रतिनिधी चंद्रहास चौधरी म्हणाले की, तीन दिवसांपासून चांगला पाणीपुरवठा होत आहे. आमची साडेनऊ लाख लिटर पाण्याची गरज सध्या भागत आहे. त्यामुळे आम्ही पाटील यांच्या कामगिरीवर समाधानी आहोत. मोर्चाला शब्द दिल्याप्रमाणे स्वत: त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. सध्या पाणी समस्या सुटली आहे. त्यामुळे येथील हजारो त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे. टँकरने पाणी आणण्यासाठी सोसायटीला प्रतिदिन सुमारे ८२ हजार रुपये खर्च येत होता. आठ महिने आम्ही ते सहन केले, पण अखेरीस तेवढे पैसे रोजच्या रोज उभे करणे हे आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यामुळे नाईलाजाने रहिवाशांनी मोर्चा काढला. पण त्याची फलश्रुती म्हणून की काय पाणी मिळायला लागले आहे. हे पाणी आमच्या हक्काचे आहे.
-----------
रिजन्सी इस्टेटच्या रहिवाशांनी माझ्याकडे त्यांची समस्या मांडली. मी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. जे तांत्रिक बदल केले, ते अजून पूर्ण झालेले नाहीत. त्या भागात एक शटडाऊन घेऊन तासाभराचे काम करायचे आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. हळूहळू माहिती घेत असून समस्या सोडविण्यावर भर राहील.
- रमेश पाटील, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी
--------------