दोन दिवसांत १५ हजारांची नोंदणी, जिल्हाधिकाऱ्यांनी केली निवडणूकपूर्व कामांची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 12:43 AM2019-03-06T00:43:02+5:302019-03-06T00:43:14+5:30
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन दिवसीय विशेष मतदारनोंदणी मोहीम हाती घेतली होती.
ठाणे : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन दिवसीय विशेष मतदारनोंदणी मोहीम हाती घेतली होती. त्यात सुमारे १५ हजार नवीन मतदारांनी नाव नोंदणी केल्याचे उघड झाले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस मतदार नोंदणीच्या या विशेष मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. या दरम्यान सुमारे १५ हजार नवीन नोंदणीचे अर्ज स्वीकारण्यात आले. जिल्ह्यातील निवडणुकीपूर्वीच्या कामांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारी स्वत: काही मतदानकेंद्रांना भेटी देऊन या मोहिमेची पाहणी केली. यात विशेष म्हणजे १८ ते १९ वयोगटातील सुमारे १३ हजार १३६ अर्ज स्वीकारण्यात आले. बेलापूर येथे सर्वाधिक दोन हजार ११२ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर मुंब्रा कळवा येथे सर्वात कमी म्हणजे ३८३ अर्ज आले आहेत.
१ जानेवारीच्या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापी, यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात आली. दोन्ही दिवस सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारत होते. नागरीकांनी आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी वेबसाईट व १९५० हेल्पलाईनचादेखील उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले.
> सुविधांची चाचपणी
नार्वेकर यांनी विविध मतदानकेंद्रांना भेटी देऊन मोहिमेची पाहणी करून भारत निवडणूक आयोगाने सुचना दिल्याप्रमाणे मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा आहेत किंवा नाहीत हे तपासले.
विशेषत: दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, लिफ्ट, व्हील चेअर आदी विविध सुविधा असल्याची खात्री त्यांनी करून घेतली.
तसेच आवश्यक त्या सुचना दिल्या. त्यांच्यासमवेत तहसीलदार निवडणूक सर्जेराव म्हस्के पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर आदी अधिकाऱ्यांचा समावेश होता.