ठाण्यातील लसीकरण केंद्रांवर मुंबई, नवी मुंबईकरांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:42 AM2021-05-07T04:42:20+5:302021-05-07T04:42:20+5:30

ठाणे : ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रात शहरातील नागरिकांकडून ऑनलाइन बुकिंग होत असल्याचे उघड झाले असतानाच, आता ठाणे शहरातील लसीकरण ...

Registration of Mumbai, Navi Mumbaikars at Vaccination Centers in Thane | ठाण्यातील लसीकरण केंद्रांवर मुंबई, नवी मुंबईकरांची नोंदणी

ठाण्यातील लसीकरण केंद्रांवर मुंबई, नवी मुंबईकरांची नोंदणी

Next

ठाणे : ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रात शहरातील नागरिकांकडून ऑनलाइन बुकिंग होत असल्याचे उघड झाले असतानाच, आता ठाणे शहरातील लसीकरण केंद्रांवरही मुंबई, नवी मुंबईसह अन्य शहरांतील नागरिकांची संख्या लक्षणीय असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकाराकडे भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

कोविन ॲपवर लसीकरणासाठी नोंद करण्यात येते. मात्र, त्यावर भारतातील कोणत्याही केंद्रांवर लस नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. त्याचा स्थानिक नागरिकांना फटका बसत आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसीकरणासाठी गेलेल्या शहरातील नागरिकांविरोधात नाराजी असतानाच, आता ठाणे शहरातही बाहेरच्या शहरातील नागरिकांना लस दिली जात असल्याचे उघडकीस आले आहे. ठाणे शहरातील ग्लोबल कोविड हॉस्पिटलसह विविध ठिकाणी लसीकरण केले जाते. या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने मुंबईतील दादर, अंधेरी, घाटकोपर, नवी मुंबईबरोबरच भाईंदर, पनवेल येथील नागरिकांनी नोंदणी केली असल्याचे आढळले. विशेषत: ऑनलाइन नोंदणीत ठाणेकरांचे प्रमाण अल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीद्वारे ठाणेकरांऐवजी परशहरातील नागरिकांचा फायदा होत आहे. ठाण्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण जादा असल्यामुळे ठाण्यातील लसीकरणात ठाण्यातील नागरिकांनाच प्राधान्य द्यायला हवे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ऑनलाइन कोट्याची वेळ जाहीर करा

कोविन ॲपवर १८ ते ४४ पर्यंतच्या नागरिकांची नोंदणी बंधनकारक आहे. मात्र, ऑनलाइन कोटा केव्हा खुला होतो, याबद्दल नागरिकांना काहीही माहिती उपलब्ध होत नाही. अनेक नागरिकांना खुला झालेला कोटा पहावयास मिळाला नाही. त्यामुळे रेल्वेच्या रिझर्व्हेशन सिस्टीमप्रमाणे सकाळी ८ वाजता नोंदणी खुली करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

---------------------

पिनकोडनुसार नोंदणीसाठी पंतप्रधानांना पत्र

स्थानिक नागरिकांना लसीकरणात प्राधान्य मिळण्यासाठी आधार कार्डवरील पिन कोड क्रमांकानुसार नागरिकांची नोंदणी करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. पिनकोडमुळे स्थानिक नागरिकांना लस उपलब्ध होईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Web Title: Registration of Mumbai, Navi Mumbaikars at Vaccination Centers in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.