नोकरीसाठी ठाणे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी!
By सुरेश लोखंडे | Published: February 19, 2024 05:19 PM2024-02-19T17:19:09+5:302024-02-19T17:19:24+5:30
जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागात तब्बल ४३१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यातील गांवखेडे व पाड्यांमध्ये बहुतांशी सुशिक्षित बेरोजगार रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे.
ठाणे : जिल्ह्यातील गांवपाडे, खेड्यांमध्ये सुशिक्षित बेरोजगार मोठ्याप्रमाणात आहेत. त्यांची दखल घेऊन त्यांना राोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने ग्राम पंचायत क्षेत्रामध्ये नोकरी इच्छूक उमेदवारांचे गावात सर्वेक्षण करून त्यांच्या नाव नोंदणी संबंधित ग्राम विस्तार अधिकारी, ग्राम सेवक यांनी तत्काळ करून त्यांची नावे https:rojgar.mahaswayam.gov.in या महास्वयम शासकीय पोर्टलवर नोंद करण्याचे आदेश ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना जारी केले आहे.
जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागात तब्बल ४३१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यातील गांवखेडे व पाड्यांमध्ये बहुतांशी सुशिक्षित बेरोजगार रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना नामंकित उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी २४ व २५ फेब्रुवारी या दोन दिवसांचा "नमो महारोजगार मेळावा" आयोजित केला आहे. हा मेळावा ठाणे येथील हायलॅण्ड ग्राउंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे हा विभागस्तरीय रोजगार मेळावा आहे. त्यात या युवा, युवतींना नोकरी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक ग्राम पंचायतीने किमान ५० युवक, युवती नोंदणी या महास्वयम शासकीय पोर्टलवर करण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहे.
यास अनुसरून ग्रामीण्, दुर्गम गांवखेड्यांच्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये नोकरी इच्छुक उमेदवारांची जास्तीत-जास्त नोंदणी पोर्टलवर करण्याचे आदेश ग्राम सेवकांना जारी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी, यांनी महास्वयम शासकीय पोर्टलवर नोकरी इच्छूक उमेदवारांची नोंदणी केले बाबतचा ग्रामपंचायत निहाय अहवाल हार्ड व सॉफ्ट मध्ये दररोज ग्रामपंचायत विभागाचे ई-मेलवर पाठविण्याचे आदेश जारी झालेले आहेत. या उद्दिष्टामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने महास्वयम शासकीय पोर्टल https:rojgar.mahaswayam.gov.in वर नोंदणी करण्याची सक्त ताकीद आहे. यासाठीसाठी ग्रामपंचायत,गाव निहाय प्रचार, प्रसिध्दी, अभियान राबविण्यात येत आहे.