बनावट कागदपत्रांच्या आधारे देशभरातील आरटीओ कार्यालयांत स्क्रॅप वाहनांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:24 PM2018-09-28T22:24:01+5:302018-09-28T22:36:09+5:30
तांत्रिकदृष्टीया बिघाड असलेली वाहने कंपनीने भंगारात काढल्यानंतर त्यांची बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणी करणा-या दोन आरटीओ अधिका-यांसह चौघा जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन कोटी २३ लाख ९७ हजार ९९८ रुपयांची ३४ वाहने जप्त करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एका खासगी नामांकित कंपनीच्या स्क्रॅप (भंगारातील) वाहनांची खरेदी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्टÑासह देशभरातील विविध राज्यांतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांत, आरटीओ कार्यालयात नोंदणी करून त्यांची विक्री करणा-या दलाल, विक्रेत्यांसह दोन आरटीओ अधिका-यांना जेरबंद केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
टाटा मोटार्स लि. कंपनीने स्क्रॅप केलेल्या अशा ४८१ वाहनांची नोंदणी करण्यात आली असून त्यातील दोन कोटी २३ लाख ९७ हजार ९९८ रुपयांची ३४ वाहने जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने केलेल्या या धडक कारवाईमुळे राज्यभरातील आरटीओ अधिकाºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नारपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अशाच फसवणुकीच्या गुन्ह्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत हे तपास करत असताना स्क्रॅपची वाहने लिलावात विक्री केल्यानंतर काहींनी ही वाहने स्क्रॅप करण्यासाठी विकत घेतली. नंतर, मात्र तीच वाहने बनावट कागदपत्रांच्या आधारे आरटीओ कार्यालयात नोंदणी केल्याचे आढळले. या सर्व प्रकारामुळे राज्य शासनाचाही ३१ लाख ७७ हजार ५५८ रुपयांचा विक्रीकर बुडाल्याचा आढळले आहे. त्यामुळे राऊत यांनी याप्रकरणी भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. स्क्रॅपची वाहने खरेदी करणारा सचिन सोनवणे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बीड कार्यालयात नोंदणी करणारा दलाल शाकीर सय्यद यांना २९ आॅगस्ट २०१८ रोजी अटक केली. त्यांच्याकडे ३६ वाहनांच्या नोंदणीची बनावट कागदपत्रे आढळली. टाटा मोटार्स लि. कंपनीकडून स्क्रॅपसाठी दिलेली ४२८ व्यावसायिक वाहनांची महाराष्टÑात तसेच इतर राज्यांत बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी झाल्याचे आढळले. त्यापैकी २४ वाहने जप्त केली आहेत. तर याच कंपनीची ५३ प्रवासी वाहनांचीही अशाच प्रकारे विविध आरटीओ कार्यालयांमध्ये नोंदणी झाली. त्यातील १० वाहने जप्त केली असून दोन्हींमधील आणखी वाहने जप्त करण्याची कारवाई सुरू असल्याचेही पवार यांनी सांगितले. बीड कार्यालयातील तत्कालीन वाहन निरीक्षक राजेंद्र निकम आणि निलेश भगुरे यांनी अस्तित्वात नसलेली आणि स्क्रॅप करण्याची लेफट हॅण्ड वाहने बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केल्याचे आढळल्यानंतर त्यांनाही २५ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, उपायुक्त दीपक देवराज आणि सहायक आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राऊत आणि निरीक्षक अशोक होनमाने यांचे पथक याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.