सिराज हाॅस्पिटलची दाेन महिन्यांसाठी नाेंदणी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:26 AM2021-06-22T04:26:37+5:302021-06-22T04:26:37+5:30
भिवंडी : रुग्णांकडून उकळलेले जादा बिलाचे पैसे महापालिका प्रशासनाने आदेश देऊनही परत न केल्याने भिवंडीतील खासगी काेविड रुग्णालय सिराज ...
भिवंडी : रुग्णांकडून उकळलेले जादा बिलाचे पैसे महापालिका प्रशासनाने आदेश देऊनही परत न केल्याने भिवंडीतील खासगी काेविड रुग्णालय सिराज हाॅस्पिटलचा नाेंदणी परवाना दाेन महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. डाॅ. नरुद्दीन अन्सारी यांच्या रुग्णालयावर महापालिका आयुक्त डाॅ. पंकज आशिया यांच्या या कडक कारवाईमुळे जादा पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांत खळबळ उडाली आहे.
भिवंडी शहरात काेराेना रुग्णवाढीच्या काळात आयुक्तांनी सिराज हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटल घोषित केले होते. येथे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेनुसार उपचार करणे व ज्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नव्हता त्यांच्यावर शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार उपचार करणे बंधनकारक हाेते; मात्र रुग्णालयाने रुग्णांकडून जादा पैसे उकळल्याचे लेखा समितीच्या तपासणीत उघड झाले. त्यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात दाेन लाख ६६ हजार ६०० रुपये, तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात १२ लाख २२ हजार रुपये रुग्णांना परत देण्याचे आदेश देण्यात आले. सिराज हॉस्पिटल व्यवस्थापनाने ती रक्कम रुग्णांना परत न केल्यामुळे, तसेच कोविड रुग्णांच्या मृत्यूसंदर्भात घेतलेल्या बैठकींना रुग्णालय व्यवस्थापकांनी गैरहजेरी लावल्याने महापालिकेने सिराज मेमोरिअल हॉस्पिटलसाठी दिलेले नोंदणी प्रमाणपत्र दोन महिन्यांसाठी रद्द केले आहे. त्यामुळे दाेन महिन्यांच्या कालावधीत हॉस्पिटलचे संपूर्ण कामकाज बंद न ठेवल्यास कारवाई केली जाईल, असे आदेश आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.