बाधीत झालेल्यांचे पुनर्वसन करा; दक्ष नागरीकासह बाधीतांचे महापालिका मुख्यालयासमोर उपोषण
By अजित मांडके | Published: December 18, 2023 03:42 PM2023-12-18T15:42:41+5:302023-12-18T15:43:35+5:30
जो पर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
अजित मांडके, ठाणे : कळवा खाडीत उभ्या असलेल्या अनाधिकृत झोपड्या बांधणाऱ्यांवर पालिकेने कारवाई केली होती. त्यानंतर त्यातील काही लोकांचे पुनर्वसन देखील करण्यात आले आहे. परंतु सर्वांना हक्काचे घर मिळायला हवे या मागणीसाठी दक्ष नागरीक संगम डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी महापालिका मुख्यालयासमोर रहिवाशांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. जो पर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
कळवा खाडीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या झोपड्यांवर महापालिकेने काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती. त्यामुळे येथील सुमारे २६० कुटुंबे बेघर झाली. त्यानंतर येथील रहिवाशांनी हक्काचे घर मिळावे यासाठी आंदोलनही उभे केले होते. मधल्या काळात १४० रहिवाशांना घरही देण्यात आले, परंतु काही अपात्रही ठरल्याने त्यांना घर मिळू शकले नाही. यासाठी काही दिवसांपूर्वी संगम डोंगरे यांनी थेट खाडीत उतरुन आंदोलन केले होते. प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु अद्यापही प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली न झाल्याने नाईलाजास्तव उपोषणाचे हत्यार उपसावे लागल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार सोमवार पासून महापालिका मुख्यालयाजवळ हे आंदोलन सुरु करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रत्येकाला हक्काचे घर मिळायला हवे, एकाला एक न्याय दुसºयाला दुसरा न्या का देता असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. प्रशासन जाणून बजून याकडे कानाडोळा करीत असल्याचेही ते म्हणाले.