पुनर्वसित ग्रामस्थांनी दिला जुन्या घरी परतण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:25 AM2019-07-27T00:25:34+5:302019-07-27T00:25:44+5:30
बारवी धरणग्रस्त संतप्त : जिल्हाधिकाऱ्यांपुढे वाचला समस्यांचा पाढा
सुरेश लोखंडे
ठाणे : यंदाच्या पावसाळ्यात बारवी धरणाच्या पाण्याखाली सहा ते सात गावे जाणार आहेत. यापैकी मुरबाड तालुक्यातील तोंडली या संपूर्ण गावाचे पुनर्वसन झाले; मात्र अत्यंत कमी दर्जाच्या सुविधांमुळे या ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुनर्वसन केलेल्या ठिकाणी उत्तम दर्जाच्या सुविधा द्या, अन्यथा पुन्हा जुन्या घरात राहण्यास जाण्याचा इशारा ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी दिला आहे.
‘बारवीमध्ये ६३ टक्के पाणीसाठा’ मथळ्याखाली लोकमतने २३ जुलैला वृत्त प्रसिद्ध करून जलसमाधी मिळणाºया गावपाड्यांचे वास्तव उघड केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी २४ जुलैला तोंडलीच्या पुनर्वसित गावठाणाला भेट देऊन गावकºयांशी चर्चा केली. या भेटीदरम्यान गावकºयांनी सोयीसुविधांचा अभाव असून रस्त्यांसह गटारी व शौचालयांच्या कामांचीही तक्रार केली. कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन भूखंडावर या तोंडली गावकºयांंचे पुनर्वसन केले. यंदा बारवी धरणात चार मीटर वाढीव पाणीसाठा होणार आहे. त्याखाली या तोंडली गावाला जलसमाधी मिळणार आहे. तत्पूर्वी, या गावकºयांचे सासणे ग्रामपंचायत हद्दीत टेपाची वाडीजवळ व नदीकाठाला लागून असलेल्या गावठाणात पुनर्वसन केले आहे.
या पुनर्वसित गावाच्या गावठाणाला भेट देऊन जिल्हाधिकाºयांनी पाहणी केली. पावसामुळे त्यांना फारवेळ थांबता आले नाही. यादरम्यान नदीकाठाजवळील पुनर्वसित कातकरी समाजाच्या ग्रामस्थांनी गाडीला गराडा टाकत या सोयीसुविधांकडे जिल्हाधिकाºयांचे लक्ष वेधले. बारवी धरण विस्थापित शेतकरी संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ बांगर, सचिव किसन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ३१ शेतकºयांच्या स्वाक्षरीने लेखी तक्रार करून उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा द्या, अन्यथा आम्हाला परत आमच्या घरी जावे लागेल. त्यानंतरची सर्व जबाबदारी एमआयडीसीच्या अधिकाºयांची राहील, असा इशाराही त्यांनी लेखी स्वरूपात दिला आहे.