ठाण्यातील १४९ निराधार मनोरुग्णांचे होणार पुनर्वसन; राज्य शासनाकडून कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 05:28 AM2019-12-06T05:28:44+5:302019-12-06T05:29:07+5:30
मनोरुग्णांना उपचारासाठी त्यांचे नातेवाईक सोडून जातात.
ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातून पूर्णत: बरे झालेल्या १४९ निराधार मनोरुग्णांचे पुनर्वसन केले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाकडून ही कार्यवाही केली जात असल्याचे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून सांगण्यात आले. यात वृद्ध निराधार मनोरुग्णांचाही समावेश आहे.
मनोरुग्णांना उपचारासाठी त्यांचे नातेवाईक सोडून जातात. परंतु, ते बरे झाल्यावर काहींचे नातेवाईक त्यांना परत घेऊन जाण्यासाठी फिरकतच नाहीत, तर काही असे मनोरुग्ण असतात, जे अनोळखी म्हणून कायदेशीर कार्यवाहीच्या माध्यमातून दाखल झालेले असतात. अशा निराधार मनोरुग्णांची ओळख पटत नसल्याने किंवा त्यांचा पत्ता लागत नसल्याने बरे होऊनही तेही मनोरुग्ण वर्षानुवर्षे मनोरुग्णालयातच असतात. त्यामुळे अशा मनोरुग्णांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. बरे झाल्यानंतरही अशा मनोरुग्णांचे पुढे शासनाने काय केले, यासंदर्भात ही याचिका होती. या याचिकेची दखल घेऊन शासनाकडून विविध संस्थांत या मनोरुग्णांचे पुनर्वसन केले जाणार आहे. ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयातून १४९ मनोरुग्णांचे पुनर्वसन होत असल्याचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रीटा परवडे यांनी सांगितले. यात ९१ महिला तर ५८ पुरुषांचा समावेश आहे. ६० वर्षांवरील मनोरुग्णांचे वृद्धाश्रमात पुनर्वसन केले जाणार आहे. कोणत्या संस्थेत या मनोरुग्णांना पाठवायचे, याची मात्र कार्यवाही सुरू असल्याचे मनोरुग्णालयाने सांगितले. मनोरुग्णांचे पुनर्वसन झाल्यास त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगता येईल, त्यांचा आत्मविश्वास आणखीन वाढेल आणि स्वबळावर उभे राहून यशस्वी होतील, असा विश्वास डॉ. परवडे यांनी व्यक्त केला.
- या निराधार मनोरुग्णांचे पुनर्वसन होणार म्हणून त्यांना आॅल रोटरी क्लब आॅफ ठाणेच्या वतीने दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंचे किट शुक्रवारी सकाळी मनोरुग्णालयात जाऊन दिले जाणार आहे. यात चपला, बॅग्ज, टूथब्रश, टूथपेस्ट, कपडे, नॅपकीन यासारख्या वस्तूंचा समावेश आहे.