ठाण्यात आजपासून कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:59 AM2021-01-05T00:59:44+5:302021-01-05T01:00:17+5:30
महापालिका प्रशासनाचा निर्णय : पुढील आठवड्यापासून लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’ या दोन्ही कोरोना लसींच्या मर्यादित आपत्कालीन वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने मंगळवारपासून पाच ठिकाणी कोरोना लसीकरण सराव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवस ही रंगीत तालीम चालणार असून, पुढील आठवड्यापासून प्रत्यक्षात लसीकरण सुरू होण्याची शक्यता विश्वासनीय सूत्रांनी वर्तविली.
महापालिका प्रशासनाने लसीकरणासाठी सहा लाख ६० हजार जणांची यादी तयार केली असून, त्यात आरोग्यसेवक, फ्रंटलाइन वर्कर्स, ५० ते ६० वयोगट आणि ६० वर्षांपुढील व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांचे दोनदा लसीकरण केले जाणार असून, दोन्ही टप्प्यांतील लसीकरण १३२ दिवसांमध्येच पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
महापालिका क्षेत्रामध्ये एकूण २८ आरोग्य केंद्र आहेत. त्यापैकी २० आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. एका केंद्रावर दररोज शंभर जणांना लस दिली जाणार आहे.
लसीकरणासाठी १७० जणांचे पथक तयार केले असून, एका पथकामध्ये डॉक्टर आणि कर्मचारी असे पाच ते सहा जण असणार आहेत. १७० पैकी प्रत्यक्षात १०० पथके लसीकरणाचे काम करणार आहेत, तर ७० पथके राखीव असणार आहेत. या पथकांमार्फत शहरात केव्हाही लसीकरण मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.
ही आहेत ती पाच ठिकाणे
nमहापालिकेचे कोपरीतील प्रसूतिगृह
nकासारवडवली येथील रोझा गार्डन आरोग्य केंद्र
nमुंब्रा प्रेक्षागृह
nपोखरण रस्ता २ येथील आंबेडकर भवन
nमुंब्य्रातील महापालिका शाळा क्रमांक ७८
या पाच ठिकाणी ही लसीकरण सराव फेरी होणार आहे. त्यासाठी या ठिकाणी मोबाइलवर संदेश पाठवून २५ जणांना बोलावले जाणार आहे.