महासभेत पुन्हा गोंधळात मंजुर झाले ९०० कोटींहून अधिकचे प्रस्ताव, भाजपा व राष्ट्रवादीने घातला महापौरांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 05:36 PM2018-10-20T17:36:15+5:302018-10-21T03:06:13+5:30
नेहमी प्रमाणे शनिवारी झालेल्या महासभेतसुध्दा गोंधळ करुन सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाशी केलेल्या हातमिळवणीत अनेक महत्वाचे विषय चर्चेविनाच मंजुर करुन घेतले. याविरोधात भाजपा आणि राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.
ठाणे - सोनेरी ठेकेदार कोण कोण... सत्ताधारी हाय हाय अशा घोषणा देऊन विरोधकांनी टीएमटीतर्फे १५० बसची दुरुस्ती करून त्या खाजगी ठेकेदाराला चालविण्यास देण्यासंदर्भातील प्रस्तावाला शनिवारच्या महासभेत जोरदार विरोध केला. या गोंधळातच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी अवघ्या काही मिनिटातच तब्बल ९०० कोटींहून अधिकचे प्रस्ताव मंजूर करून घेतले. यामुळे संतप्त झालेल्या भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांनी घेराव घालून डायसवर ठिय्यादेखील मांडला. परंतु, तोपर्यंत महासभाच संपली होती.
या महासभेत रस्ते, गटार, पायवाटा, मलनिसारण,आरोग्य असे एकाहून एक कोट्यावधीचे विषय मंजुरीसाठी पटलावर होते. यात काही किचकट प्रस्तावसुद्धा होते. या विषयांवरून वादंग होणार हे निश्चित मानले जात होते. तसेच शहरातील बेकायदा होर्डिंग्जचा विषयही महासभेत गाजणार होता. त्यामुळे या प्रकरणावरून प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता होती. त्यानुसार महासभेची सुरुवात होताच टीएमटीच्या ताफ्यातील १५० बसची ८.५० कोटी खर्चुन दुरुस्ती करून त्या खाजगी ठेकेदाराला चालविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी पटलावर आला असता, राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या प्रस्तावात भ्रष्टाचाराचा वास येत असल्याचा आरोप करून ठराविक सोनेरी ठेकेदाराला बस देण्यासाठीच तो आणल्याचा गौप्यस्फोटही केला. यावेळी प्रशासनावर आरोप करतांनाच सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरद्धा त्यांनी शंका उपस्थित केल्या. या बसवर चालक खाजगी ठेकेदाराचे राहणार असून परिवहनच्या कर्मचाºयांचे काय करणार असा सवालही त्यांनी केला. तसेच १५० बसपैकी ८० बसचे आयुर्मान संपले असून त्या दुरुस्त करून केवळ ठेकेदारासाठी पायघड्या कशासाठी असा सवालही त्यांनी केला. एकामागून एक आरोप ते प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर करीत असतांनाच सभागृह नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. येथूनच पुढे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद सुरू झाले. गोंधळ थांबत नसल्याने अखेर पीठासीन अधिकारी तथा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी विषय पत्रिका वाचण्यास सांगितले आणि गोंधळातच अनेक महत्त्वाचे विषय कोणत्याही प्रकारची चर्चा न करता मंजूर केले. याबाबत भाजपाने आक्षेप घेत थेट डायसवर जाऊन महापौरांना घेराव घातला. राष्ट्रवादीच्या मंडळींनीसुध्दा घेराव घातला, परंतु तो पर्यंत अजेंड्यावरील सर्व विषय मंजुर करुन घेत, सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रगीत घेत महासभा संपविली.