निपुंगेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला, पोलिसांचा अटक करण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 03:14 AM2017-09-26T03:14:14+5:302017-09-26T03:14:25+5:30
महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे यांचा जामीन अर्ज, सोमवारी अखेर जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. बावनकर यांनी फेटाळला.
ठाणे : महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे यांचा जामीन अर्ज, सोमवारी अखेर जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. बावनकर यांनी फेटाळला. त्यामुळे निपुंगेंना अटक करण्याचा पोलिसांचा मार्गही मोकळा झाला आहे.
या प्रकरणात एसीपींविरुद्ध परिस्थितीजन्य, तसेच प्रथमदर्शनी पुरावे आहेत. तिला त्यांनी १११ कॉल्स केल्याचेही सीडीआर रेकॉर्ड मिळाले आहे. जुलै २०१७ पासून ते तिचा मानसिक छळ करत होते. याबाबत, तिने आपल्या भावी नवºयालाही माहिती दिली होती. याच आधारावर तिच्या भावाने कळवा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत निपुेंगेचे नाव घेतले आहे. कॉन्स्टेबलनंतर अनेक अधिकारी असतानाही, त्यांनी तिला वारंवार संपर्क करण्याचे कारण स्पष्ट होत नाही. अशा अनेक बाबी पोलिसांच्या वतीने सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी निदर्शनास आणल्या. चौकशीसाठी त्यांची पोलीस कोठडी गरजेची असून, त्यांचा मोबाइलही जप्त करण्याची परवानगी मागितली. त्यावर, निपुंगे यांचा या आत्महत्येशी संबंध नाही, पण ते पोलिसांना संपूर्णपणे सहाय्य करतील. त्यामुळे त्यांना रोज पोलीस ठाण्यात हजेरी लावावी. मोबाइलही ते द्यायला तयार आहेत, परंतु त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा, अशी बाजू आरोपीच्या वतीने अॅड. धोत्रे यांनी मांडली. उभय पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर, सोमवारी न्यायालयाने निपुंगेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
काय होऊ शकते...
ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने निपुंगेंचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळला होता. आता अटकपूर्व जामीन अर्जही उभय पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर फेटाळला. यामुळे त्यांना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाद मागावी लागेल. त्या काळात पोलीस त्यांना अटक करू शकतात, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.