नातेवाईकच निघाला चोर, रोकडसह ५८ हजारांचा ऐवज हस्तगत, उधारी चुकवण्यासाठी केली चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 08:31 PM2017-10-29T20:31:02+5:302017-10-29T20:31:41+5:30
हार्डवेअरच्या व्यवसायात आलेल्या तोट्यामुळे आपल्याच मेहुण्याकडे चोरी करणा-या कमलेंदर सिंग हुलावत याला कळवा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
ठाणे - हार्डवेअरच्या व्यवसायात आलेल्या तोट्यामुळे आपल्याच मेहुण्याकडे चोरी करणा-या कमलेंदर सिंग हुलावत (२८, रा. किंजल, दिघा, नवी मुंबई) याला कळवा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून रोकडसहित ५८ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
कळव्याच्या न्यू शिवाजीनगर येथील विनायक चाळीत राहणारे रूपसिंग राठोड (३६) यांच्या घरात २५ आॅक्टोबरला सकाळी ७.३० ते २६ आॅक्टोबरला रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान चोरी झाली. यामध्ये ६८ हजारांची रोकड, अर्धा तोळा सोन्याचे मंगळसूत्र तसेच काही दागिने असा ८२ हजारांचा ऐवज चोरीस गेला. याप्रकरणी राठोड यांनी २७ आॅक्टोबर रोजी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी त्यांच्यासमवेत काही नातेवाईकही होते. त्यात त्यांच्या बहिणीचे पती कमलेंदर (मेहुणे) यांचाही समावेश होता. या चोरीचा तपास लवकर लावावा, असा आग्रहदेखील त्यांनी पोलिसांकडे धरला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, निरीक्षक तुकाराम पवळे, अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे उपनिरीक्षक संजय पाटील यांनी राठोड यांच्या घराची पाहणी केली. तेव्हा या घराची चावी कोणाकडे असते, आणखी कोणकोण नातेवाईक तिथे आले? या सर्व बाबींची चौकशी त्यांनी केली. तेव्हा संशयाची सुई कमलेंदर यांच्याकडेच आली. तरीही, आपण त्या गावचे नसल्याचा आव आणणाºया या मेहुण्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. याच चौकशीत त्याने या चोरीची अखेर कबुली दिली. हार्डवेअरच्या व्यवसायात तोटा झाल्यामुळे अनेकांची मोठ्या प्रमाणात उधारी झाली होती. ही उधारी चुकवण्यासाठी देणेदारांनी तगादा लावला होता. मग, जितक्या पैशांची गरज होती, तेवढीच रोकड आणि दागिन्यांची चोरी केली, असा दावाही त्याने पोलिसांकडे केला. त्याच्याकडून चोरीतील सर्व १५ हजारांचे सहा ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४३ हजारांची रोकड असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. २७ आॅक्टोबरलाच त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ३० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.