मृत तरूणाच्या दहाव्याच्या दिवशी नातेवाईक पोहोचले पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 08:55 PM2018-12-25T20:55:44+5:302018-12-25T21:41:59+5:30
भिवंडी : तालुक्यातील लोनाड गावात भिसीच्या वादातून झालेल्या हाणामारीत गणेश चंद्रकांत पवार (२८)याचा अकस्मात मृत्यु झाला. या युवकाच्या मृतदेहाचे ...
भिवंडी : तालुक्यातील लोनाड गावात भिसीच्या वादातून झालेल्या हाणामारीत गणेश चंद्रकांत पवार (२८)याचा अकस्मात मृत्यु झाला. या युवकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबईतील जे.जे.रु ग्णालयात केले असता त्याचा मृत्यू नैसर्गीक नसून मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा दाखला प्राप्त झाल्याची माहिती कुटूंबीयांनी दिली.
या घटनेला दहा दिवस उलटूनही आरोपींना अटक न केल्याने त्याच्या दहाव्याच्या कार्यक्रमास आलेल्या नातेवाईकांनी पडघा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
लोनाड गावातील युवकांनी पैसे एकत्रीत जमा करून ती चिठ्ठीप्रमाणे देण्याची सार्वजनिक भिसी सुरू केली होती. १५ डिसेंबर रोजी त्यासाठी गावातील मंदिरात सर्व जमा झाले होते. त्यावेळी भिशीतील सदस्य गणेश चंद्रकांत पवार याने आपल्या वेल्डींगच्या व्यवसायाच्या निमीत्ताने व्याजाने भिशीतील उर्वरीत रक्कम मागीतली असता त्यास गुरूनाथ बारकू घरत याने विरोध केला. त्यामधून तेथे शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर घरी गेलेल्या गणेशला रात्री बाराच्या सुमारास घराबाहेर गाठून त्यास जमावाने ठोशाबुक्क््याने, लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात गणेश याचा दुर्दैवी मृत्यू झाला.या प्रकरणी पडघा पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र त्याचे वडील चंद्रकांत पवार यांनी घडलेली हकीकत सांगून गुरूनाथ घरत व त्यांच्या साथीदारा विरोधात तक्रार दाखल केली.तसेच जे.जे. रूग्णालयांच्या शवविच्छेदानाच्या दाखल्या वरून पोलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. परंतू पोलीसांनी आरोपींना अटक केली नाही. आज रोजी गणेश पवार याच्या दहाव्याच्या कार्यक्रमास आलेल्या नातेवाईकांनी पडघा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली. या घटनेमुळे लोनाड गावातील वातावरण दुषीत झाले असुन पोलीसांनी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले.