मनसेचे शाखाध्यक्ष खून प्रकरणी नातेवाईकांनी केले स्थानिक नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 11:18 PM2020-11-24T23:18:46+5:302020-11-24T23:31:32+5:30
मनसेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या खून प्रकरणी त्यांचे पुतणे फैसल शेख यांच्यासह नातेवाईकांनी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर खूनाचा संशय व्यक्त केला आहे. यातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत जमील यांचा दफनविधीही केला जाणार नसल्याची भूमीका त्यांच्या नातेवाईक आणि मनसेने घेतली आहे. दरम्यान, जमील हत्येशी आपला कोणताही संबंध नसून हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप नजीब मुल्ला यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या खून प्रकरणी त्यांचे पुतणे फैसल शेख (२९) यांच्यासह नातेवाईकांनी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावरच खूनाचा संशय व्यक्त केला आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत जमील यांचा दफनविधीही केला जाणार नसल्याची भूमीका त्यांच्या नातेवाईक आणि मनसेने घेतली आहे. मुल्ला यांच्याही अटकेची मागणी करण्यात आल्यामुळे राबोडीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकेकाळी राष्ट्रवादीतूनच बाहेर पडलेले जमील आणि नजीब मुल्ला यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु होते. त्यातच राबोडीतील क्लस्टर योजनेला स्थानिक रहिवाशांसह जमील यांनीही विरोध केला होता. जादा घरे मिळण्याचे अमिष दाखविले जात असून अधिकृत कर भरणा करणाऱ्यांनाच क्लस्टरची घरे मिळावीत, असा आग्रह जमील यांनी धरला होता. तर याऊलट, ज्यांची कागदपत्रे अधिकृत नाहीत, त्यांनाही घरे देण्याचे प्रयत्न मुल्ला यांच्याकडून करण्यात येत होते, असाही आरोप महंमद आलम इब्राहिम शेख तसेच स्थानिक रहिवशांनी केला आहे. ज्यांची घरे नाहीत त्यांचीही बायोमेट्रीक सर्व्हेक्षणात नावे आल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. यातूनच हा वाद गेल्या काही दिवसांपासून चिघळत गेला. त्यामुळेच जमील यांची हत्या घडवून आणली, असाही आरोप जमील यांचे भाच्चे सोएब अक्तर, त्यांचे मित्र साजीद शेख यांच्यासह नातेवाईकांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची नि:पक्षपणे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मार्फतीने चौकशी व्हावी, आरोपींना तातडीने अटक व्हावी, त्यानंतरच जमील यांचा दफनविधी केला जाईल, असा पवित्रा स्थानिक रहिवाशांनी घेतला आहे.
* कोण होते जमील शेख
आधी राष्ट्रवादीमध्ये नजीब मुल्ला यांच्यासमवेत असलेले जमील हे गेल्या २० वर्षांपासून राजकारणात होते. गेल्या सात ते आठ वर्षांपासून ते मनसेमध्ये कार्यरत होते. २०१४ मध्येही शेख यांच्यावर चाकूचे वार करुन जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावेळीही शेख यांनी नजीब यांच्यावरच आरोप केले होते. मात्र, याप्रकरणी दोन अन्य आरोपी अटक केले होते, अशी माहिती राबोडी पोलिसांनी दिली. जमील यांच्या मागे पत्नी खुशनूमा (३५), पाच वर्षीय जोबिया आणि चार वर्षीय जायरा या दोन मुली तसेच तोफीक आणि कुरेश हे दोन भाऊ असा परिवार आहे. समाजकार्याबरोबरच मालमत्तेचाही जमील यांचा व्यवसाय होता.
................................
‘‘हे माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र- नजीब मुल्ला
जमील यांच्या हत्येशी आपला कोणताही संबंध नसून हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा ठामपाचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी केला आहे. आपला पोलीस यंत्रणेवर विश्वास असून पोलीस यातील मारेकरी नक्कीच शोधतील. २०१४ मध्येही आपल्यावर असेच आरोप केले होते. त्यातही दोन आरोपींना राबोडी पोलिसांनी अटक केली होती. त्याचे आरोपपत्रही न्यायालयात दाखल झाले आहे. यातही नाहक आपले नाव गोवले होते. तत्कालीन सह पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांनीही तो तपास केला होता. जमील यांच्या खूनातील खरे आरोपी पोलिसांनी शोधणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे जमीलच्या घराखाली तळमजल्यावर माझे कार्यालय आहे. मग गेल्या २० वर्षांत जमीलने तिथे होणाºया गर्दीची तक्रार केलेली नाही. मग आताच असे आरोप का व्हावेत, असेही नजीब यांनी म्हटले आहे. ’’