भिवंडीत ऑक्सिजनसाठी प्रशासनासह नातेवाईकांची धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:36 AM2021-04-26T04:36:53+5:302021-04-26T04:36:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : शहर व ग्रामीण भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील कोविड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : शहर व ग्रामीण भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील कोविड सेंटर बरोबरच कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांसह नातेवाईकांची चिंता व अडचणींमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे शहरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपासह महसूल प्रशासनाचीही धावाधाव होत आहे.
भिवंडीतील धामणकर नाका परिसरात असलेल्या ऑरेंज रुग्णालयातील ऑक्सिजन साठा १३ एप्रिल रोजी अचानक संपल्याने रुग्णालय प्रशासनासह रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी मोठी धावाधाव उडाली होती. विशेष म्हणजे या रुग्णालयात त्यावेळी असलेल्या १९ रुग्णांनाही दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला रुग्णालयाने दिला होता. अखेर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा केल्याची ग्वाही दिल्याने रुग्णालय प्रशासन व येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांसह नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. सध्या शहरात रोजची रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी महापालिकेच्या वतीने खुदाबक्ष हॉल व वऱ्हाळदेवी हॉल या ठिकाणी सुमारे २७४ बेडचे दोन कोविड सेंटर उभारले आहेत. तसेच २१ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये साधारणता ५ टन ऑक्सिजन लागतो. महापालिकेच्या खुदाबक्ष हॉल येथे २ टन तर वऱ्हाळदेवी हॉल येथे १ टन ऑक्सिजन लागतो. सध्या शहरात एकूण १० टन ऑक्सिजन रोज लागत असून आता दररोज पुरेसा ऑक्सिजन साठा महापालिकेकडे उपलब्ध असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी भिवंडीतील सवाद येथे सुमारे दोन लाख चौरस फुटांचे ८१८ बेडचे भव्य ग्रामीण जिल्हा कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात १८ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा साठविण्याची सोय आहे. मात्र या रुग्णालयातही ऑक्सिजन साठा अपुरा असल्याने या कोविड सेंटरमध्ये सध्या रुग्णांना प्रवेश मिळण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन नसल्याने रुग्णाला रुग्णालयात प्रवेश नाकारल्याने श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. अखेर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रमजीवीच्या मागणीची दखल घेत सवाद कोविड रुग्णालयात २४ टन ऑक्सिजन निर्माण करण्याचा स्वतंत्र प्लांट उभारणार असल्याचे जाहीर केले असून १ मे पासून याठिकाणी पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध होणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे.