उल्हासनगर इमारत दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक मदतीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:44 AM2021-09-06T04:44:15+5:302021-09-06T04:44:15+5:30
उल्हासनगर : शहरातील मोहिनी पॅलेस व साई पॅलेस इमारतीचा स्लॅब पडून मृत झालेल्यांचा नातेवाइकांना ४ महिने उलटूनही आर्थिक मदत ...
उल्हासनगर : शहरातील मोहिनी पॅलेस व साई पॅलेस इमारतीचा स्लॅब पडून मृत झालेल्यांचा नातेवाइकांना ४ महिने उलटूनही आर्थिक मदत मिळाली नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. राज्य शासनाने त्यांना त्वरित मदत देण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरू असून ४ महिन्यांपूर्वी मोहिनी व साई पॅलेस इमारतीचे स्लॅब पडून १२ जणांचे बळी गेले. या प्रकाराने शहरातील धोकादायक व अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी करून मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. शासनाकडून ५ लाखांची मदतही मृतांच्या नातेवाइकांना जाहीर केली. दरम्यान, धोकादायक व अवैध इमारतीवर तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करून, १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. मात्र अद्यापही याबाबत निर्णय झाला नाही. मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदतही मिळाली नसल्याने, सरकारवर टीका होत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी इमारतीच्या दुर्घटनेनंतर सावधगिरीचा उपाय म्हणून १० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या नोटिसा पाठविल्या. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी समितीची स्थापना करून, धोकादायक इमारतींचे ऑडिट सुरू केले. अतिधोकादायक इमारती निष्कासित करण्याची कारवाई सुरू केली. एकूणच अवैध व धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याबाबत पालकमंत्री शहरहिताचा निर्णय घेतील, असा विश्वास सर्वपक्षीय नेते व नागरिक व्यक्त करीत आहेत.
..........
मृतांच्या नातेवाइकांना लवकरच मदत : चौधरी
शहरात यापूर्वी इमारत दुर्घटनेत मृत झालेल्या नातेवाइकांना महापालिकेने आर्थिक मदत केली. यावेळी शासनाच्या वतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ लाखांची मदत मृतांच्या नातेवाइकांना जाहीर केली. याबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच मदत मिळणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.