३१ डिसेंबरला संचारबंदीची अट शिथिल करा, नववर्षाच्या स्वागताला मनसे रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 03:49 PM2020-12-26T15:49:21+5:302020-12-26T15:50:45+5:30
ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली
ठाणे : नविन वर्षाच्या स्वागत जल्लोषात व्हावे आणि तरुणांना याचा आनंद घेता, यावा यासाठी सरकारने लादलेल्या संचारबंदीच्या अटी ३१ डिसेंबर दिवशी तरी शिथिल कराव्यात अशी मागणी मनसेने केली आहे. आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि नवीन वर्षाच्या स्वागत जोषात करणार आहोत, असे इशाराच मनसेनेसरकारला दिला आहे. त्यामुळे, सरकार मनसैनिकांच्या भावनांचा विचार करणार की रस्त्यावर उतरणाऱ्यांवर कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात २२ डिसेंबर महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी ५ जानेवारीपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. परंतु या सांचारबंदीला मनसेने विरोध केला आहे. अनेक तरुण मंडळी तसेच हौशी लोक मनसेकडे नववर्षासाठी अटी शिथिल करण्याची मागणी या चार पाच दिवसांपासून करीत आहे ही मागणी लक्षात घेता तसेच वर्षभर सण उत्सव हे निर्बंधातच गेल्याने एका दिवसापुरती हा निर्बंध उठवावे अशी मागणी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे. दिवसा एकत्र फिरल्यावर कोरोना होत नाही, रात्रीचा संचार केल्यावरच कोरोना होतो हा कोणता शोध राज्य सरकारने लावला, असा सवालही त्यांनी केला. तसेच कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याचा दावा करीत जाधव यांनी ३१ डिसेंबर या एका दिवसापूर्ती तरी रात्रीची संचारबंदी उठवावी आणि या दिवशी संचार करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.