खाजगी मालकीत खितपत पडलेल्या गोपाळगडाची मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 12:39 AM2019-01-30T00:39:15+5:302019-01-30T06:49:14+5:30

पुरातत्त्वाचा लागला फलक; आठ वर्षांच्या लढ्याला आले यश; महसूल खात्याच्या चुकीमुळे ऐतिहासिक ठेवा झाला होता खाजगी मालमत्ता

Release of Gopalgad, which is owned by private ownership | खाजगी मालकीत खितपत पडलेल्या गोपाळगडाची मुक्तता

खाजगी मालकीत खितपत पडलेल्या गोपाळगडाची मुक्तता

कल्याण : शिवाजी महाराजांच्या आरमाराचा साक्षीदार असलेला गुहागर येथील गोपाळगडाची अखेर सरकारदरबारी नोंद झाली आहे. पुरातत्त्व खात्याने २३ जानेवारीला या गडावर फलक झळकवला आहे. महसूल खात्याच्या चुकीमुळे हा ऐतिहासिक ठेवा खाजगी मालमत्ता झाला होता. कल्याणच्या अक्षय पवार या तरुणाच्या आठ वर्षांच्या पाठपुराव्याला यश येऊ न खाजगी मालकीत खितपत पडलेल्या या गडाची अखेर मुक्तता झाली आहे. गडप्रेमींना या गडावर फिरून त्याचा इतिहास अभ्यासण्याची संधी मिळणार आहे.

गुहागरमधील अंजनवेल बंदराला लागून असलेला गोपाळगड हा विजापूरच्या निजामांनी बांधला होता. आरमार उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये हा गड जिंकला. महाराजांच्या मृत्यूनंतर सिद्धी खैरत खान याने हा गड ताब्यात घेतला. त्यानंतर तुळोजी आंग्रे यांनी पुन्हा या गडावर भगवा फडकविला. मात्र, पुढे पेशव्यांनी आंग्रे यांच्याकडून गडाचे अधिकार काढून घेतले. पेशव्यांचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिशांनी या गडाचा ताबा घेतला. स्वातंत्र्यानंतर १९६० मध्ये महसूल खात्याने या गडाचा लिलाव करून तो हुसेन मणियार नावाच्या व्यक्तीला विकला. मणियार यांनी ३०० रुपयांत हा गड विकत घेतला होता. मूळचा अंजनवेलचा असलेला पवार हा गावी गेला होता. पवार हा एका खाजगी एजन्सीत काम करतो. त्याच्या नजरेत हा गड आल्याने त्याने उत्सुकता म्हणून तेथे असलेल्या व्यक्तीकडे विचारपूस केली. तेव्हा त्याने आम्हाला नको, तर सरकारला जाऊन विचारा असे सांगितले. हा ऐतिहासिक ठेवा खाजगी मालकीचा कसा होऊ शकतो, या प्रश्नाने पवार याला शांत बसू दिले नाही. विशेष म्हणजे, या गडावरील रचनेत अनेक बदल करून नवीन बांधकाम करण्यात आले आहे. त्यासाठी खंदक बुजवून या ऐतिहासिक खुणा बुजवल्या आहेत. पुरातत्त्व विभागाची परवानगी न घेताच हे फेरबदल केल्याचे लक्षात आल्याने पवार यांनी माहिती अधिकारात जिल्हाधिकारी कार्यालय व केंद्र व राज्य सरकारकडे माहिती मागितली. तसेच या गडाच्या नोंदीसाठी २०१० पासून पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा सुरू केला.

सरकारने त्याच्या पाठपुराव्याची दखल घेत गोपाळगड सरकार व पुरातत्त्व मालकीचा असल्याची अधिसूचना २०१६ मध्ये काढली. सरकारने अधिसूचना काढून दोन वर्षे उलटूनही त्याठिकाणी खाजगी मालकाचा फलक होता. ही बाबही पवार यांनी पुरातत्त्व विभागाच्या निदर्शनास आणून दिली. अखेरीस २३ जानेवारीला पुरातत्त्व विभागाने त्याठिकाणी फलक लावला आहे. या फलकाचे अनावरण एन्रॉन संघर्ष लढ्याचे नेतृत्व केलेल्या प्रा. सदानंद पवार यांनी केले.

खाजगी मालकीत खितपत पडलेला हा गड मुक्त केल्याने गडप्रेमींना तो खुला होणार आहे. त्यांना इतिहास जवळून अनुभवता येणार आहे. पवार यांच्या लढ्यात पंकज दळवी, अनिकेत चाळके, साहिल जांभळे, संकेत चव्हाण, सिद्धेश जालगावकर यांचाही सहभाग होता. कल्याण पूर्वेत झालेल्या कोकण महोत्सवात पवार याचा विशेष सत्कार करण्यात आला.

सातबारावरील नोंदीमुळे झाला होता घोळ!
महसूल खात्याच्या चुकीमुळे हा गड खाजगी मालकीत अडकून पडला होता. या विभागाने या जागेच्या सातबारा उताऱ्यावर कातळवन जमीन अशी नोंद केल्याने त्यांचा लिलाव झाला होता. महसूल खात्याच्या या अजब कारभारामुळे अनेक वर्षे हा ऐतिहासिक ठेवा गडप्रेमींपासून दूर होता. खाजगी मालकीतून त्याची मुक्तता झाल्याने आता गडप्रेमींना हा इतिहास जवळून अनुभवता येणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

Web Title: Release of Gopalgad, which is owned by private ownership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.