थायलंडला नोकरी सांगून म्यानमार मध्ये बंदिस्त केलेल्या तरुणाची सुटका; एजंट विरोधात होणार कारवाई
By धीरज परब | Published: April 7, 2023 04:50 PM2023-04-07T16:50:16+5:302023-04-07T16:50:30+5:30
थायलंड येथे नोकरीसाठी पाठवून तेथून बेकायदा म्यानमार देशात जबरदस्तीने पाठवून म्यानमार मध्ये छळ करत कामास जुंपलेल्या भाईंदरच्या तरुणाची सुटका करून पोलिसांच्या भरोसा सेलने त्याला पुन्हा मायदेशी आणले आहे.
मीरारोड : थायलंड येथे नोकरीसाठी पाठवून तेथून बेकायदा म्यानमार देशात जबरदस्तीने पाठवून म्यानमार मध्ये छळ करत कामास जुंपलेल्या भाईंदरच्या तरुणाची सुटका करून पोलिसांच्या भरोसा सेलने त्याला पुन्हा मायदेशी आणले आहे. तर परदेशात नोकरी देतो सांगून फसवणूक करणाऱ्या एजंटवर कारवाईसाठी पोलिसांनी तयारी चालवली आहे.
भाईंदरच्या उत्तन येथे राहणाऱ्या परवीन शेख यांनी भाईंदरच्या भरोसा सेल कडे तक्रार दिली होती . त्यांचा मुलगा शहजान (२५) ह्याला ठाण्यातील एका एजंटने थायलंड येथे नोकरी देतो सांगून पैसे घेतले. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर रोजी एजंट ने शहजान ला आधी चेन्नई विमानतळावर पाठवले. तेथून पर्यटक व्हिसा द्वारे थायलंड मध्ये नोकरीसाठी पाठवले.
मात्र थायलंड येथे तो पोहचल्यावर त्याला तेथे नोकरी न देता तेथून बेकायदेशीर रित्या लगतच्या म्यानमार देशात बळजबरी पाठवले. त्याचा मोबाईल काढून घेत म्यानमार मधील एका कंपनीत कॉलींग करण्याचे काम दिले. दिलेले लक्ष्य पूर्ण केले नाही तर त्याचा अमानुष छळ केला जात असे. २८ दिवसांनी त्याला मोबाईल अर्ध्या तसा साठी दिल्यावर त्याने आई परवीन हिला कॉल करून झालेली फसवणूक व केला जाणारा छळ आदींची माहिती दिली.
शहजान नेमका कुठे आहे याची माहिती होत नव्हती. याच्यासोबत कोणताही संपर्क होत नसल्यामुळे तो नक्की कुठे आहे व कोणत्या परिस्थितीमध्ये आहे याबाबत परवीन यांना कोणतीही माहिती नव्हती. भाईंदर भरोसा सेलच्या प्रमुख सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबूरे व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या निदर्शनास प्रकार आणून दिल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे सह सेलचे सचिन तांबवे, आफ्रिन जुनैदी यांनी तपास सुरु केला.
शिंदे यांनी भारतीय दूतावास शी संपर्क साधून त्यांच्या मदतीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शहजान ह्याची म्यानमार येथून सुटका करण्यात आली. ३० मार्च रोजी तो मायदेशी सुखरूप परतला. या प्रकरणी ज्या एजंटने पैसे घेऊन परदेशात नोकरी देतो सांगून फसवणूक केली त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे शिंदे म्हणाल्या.
नोंदणीकृत एजंट असल्याची खात्री करा
पराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत परदेशात नोकरी साठी जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रोटेक्टर्स ऑफ इमीग्रंटस चे कार्यालय वांद्रे येथे आहे. परदेशात नोकरीसाठी पाठवणारे एजंट हे नोंदणीकृत असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. प्रदेशात नोकरी देतो सांगून फसवणारे व पुशिंगच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या अन्य देशात पाठवण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन तेजश्री शिंदे यांनी केले आहे.