ठाण्यात ‘आपला दवाखाना’चे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 05:17 AM2019-02-21T05:17:16+5:302019-02-21T05:17:53+5:30
विद्यार्थी अडीच तास उन्हात : अक्षयकुमारने जिंकले मन, आदित्य ठाकरे यांची उपस्थिती
ठाणे : गरजू रुग्णांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी ठाण्यातील श्रीनगर, वारलीपाडा आणि कळव्यातील महात्मा फुलेनगर झोपडपट्टी येथे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे लोकार्पण बुधवारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि अभिनेते अक्षयकुमार यांच्या उपस्थितीत झाले. हे दवाखाने आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महापालिकेने सुरू केले आहेत. यावेळी शिंदे यांनी राज्यभरात ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल, सभागृह नेते नरेश म्हस्के, उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे आणि शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
स्वसंरक्षण शिबिर
रेमण्ड मैदानात महापालिका शाळांमधील मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. यासाठी विद्यार्थिनींंना दुपारी २ वाजता बोलावले होते. त्या साडेचार वाजेपर्यंत शिक्षकांसह भरउन्हात पाहुण्यांच्या प्रतीक्षेत होत्या. अक्षयकुमार यांनी मुली व महिलांवरील वाढते अत्याचार रोखायचे असतील, तर त्यांनी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी सक्षम बनले पाहिजे. यासाठी त्यांनी मुलींना स्वसंरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण दिले.