ठाण्यात पक्षिमित्रांच्या मदतीने कावळयांच्या तावडीतून घुबडांच्या पिलांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 09:58 PM2018-10-17T21:58:10+5:302018-10-17T22:09:22+5:30
ठाण्यातील वसंतविहार परिसरातील इडन वुड कॉम्पलेक्समध्ये गव्हाणी जातीतील घुबडांच्या कोवळया पिलांना कावळयांनी जखमी केले होते. या कावळयांच्या तावडीतून दोन्ही पिलांची पक्षिमित्रांनी सुटका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अवघ्या दहा ते १५ दिवसांच्या गव्हाणी घुबडांच्या कोवळया पिलांना वसंतविहार परिसरातील इडन वुड कॉम्पलेक्समध्ये जखमी केल्याची घटना मंगळवारी घडली. त्यांच्यावर ते आणखीही हल्ला करण्याच्या बेतात असतांनाच पराग शिंदे या प्राणी मित्राने त्यांची या कावळयांच्या तावडीतून सुटका केली.
गव्हाणी जातीच्या दोन घुबडांच्या पिलांना कावळयांनी टोचा मारुन जखमी केले होते. स्थानिक रहिवाशी रमेश यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पक्षीमित्र पराग शिंदे यांना ही माहिती दिली. शिंदे यांनी या दोन्ही पिल्लांना आस्थेने जवळ घेऊन त्यांना ब्रह्मांड येथील प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केले आहे. दोन्ही पिल्लांची कावळयांच्या तावडीतून रमेश आणि पराग यांनी मदतीचा हात दिल्यामुळे त्यांना जीवदान मिळाले आहे.
ठाण्यात गव्हाणी, पिंगळा, ईगल आणि स्कोप अशा चार जातींची घुबडे आढळतात . ठाण्यात गव्हाणी आणि पिंगळा या दोन जातीची घुबडे नियमितपणे आढळत असल्याचे शिंदे सांगितले. या जातीच्या घुबडांचा आवाजही कर्कश असून रात्री अनेकदा घुबडांच्या कर्कश आवाजाच्या तक्र ारी नागरिकांकडून येत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. या दोन्ही पिलांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना उपचार करुन सोडण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.