चेंबरमध्ये पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:54+5:302021-08-28T04:44:54+5:30
कल्याण : पश्चिमेतील वंसत व्हॅली येथील एका टेकडीच्या परिसरातील ड्रेनेज चेंबरमध्ये पडलेल्या कुत्र्याच्या तीन पिल्लांचा जीव केडीएमसीच्या अग्निशमन दलाच्या ...
कल्याण : पश्चिमेतील वंसत व्हॅली येथील एका टेकडीच्या परिसरातील ड्रेनेज चेंबरमध्ये पडलेल्या कुत्र्याच्या तीन पिल्लांचा जीव केडीएमसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविला. या पिल्लांना ड्रेनेज चेंबरमधून बाहेर काढल्यानंतर उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केला.
कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज मोठ्या प्रमाणात येत असल्याची माहिती बुधवारी मध्यरात्री १२च्या सुमारास अग्निशमन दलाला तेथील एका सोसायटीतील रहिवाशांनी दिली. उपस्थानक अधिकारी व आधारवाडी येथील अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख विनायक लोखंडे, राहुल भाकरे, निखिल इशाने, युवराज राठोड आदींच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूला शोधाशोध घेतली असता, ड्रेनेजच्या चेंबरमध्ये कुत्र्याची पिल्ले पडली असल्याचे जवानांच्या निदर्शनास आले. कुत्र्याच्या पिल्लांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, चेंबरमधील अरुंद जागा आणि त्यात अडकलेल्या पिल्लांच्या ओरडण्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांचा जीवही कासावीस झाला होता. मात्र, जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत आणि आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावत, अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून या कुत्र्याच्या पिल्लांची सुखरूप सुटका केली. या पिल्लांना बाहेर काढण्यास आणखी थोडा जरी वेळ लागला असता, तर ते त्यांच्या जीवावर बेतले असते, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.
-------------