शेतकऱ्यांच्या मानगुटीवर रिलायन्सचे भूत
By admin | Published: May 27, 2017 02:03 AM2017-05-27T02:03:45+5:302017-05-27T02:03:45+5:30
पालघर जिल्हातून रिलायन्स गॅस पाईप लाईनचे काम युद्ध पातळीवर सुरु असून मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे.
वसंत भोईर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : पालघर जिल्हातून रिलायन्स गॅस पाईप लाईनचे काम युद्ध पातळीवर सुरु असून मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. दरम्यान, या प्रकल्पांमुळे येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीचा व काही ठिकाणी उभ्या संसाराची विल्हेवाट लागणार आहे. शिवाय कंपनी कडून अवघा साठ हजार रुपये प्रति गुंठा एवढा मोबदला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी अक्षरश: लूट सुरु असल्याने संतापाचे वातावरण आहे.
पालघर व ठाणे हे शेतीप्रधान जिल्हे आहेत. भात हे येथील मुख्य पीक आहे. वाडा व मुरबाड येथील कोलम हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. वाडा कोलम या भाताच्या वाणाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भात पिकाबरोबर येथील शेतकरी कडधान्य, फळबागा, फुलशेती व फळशेती अशी विविध उत्पादने घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरिनर्वाह करीत आहेत. असे असताना विकासाच्या नावाखाली या जिल्ह्यातून अनेक प्रकल्प यापूर्वी सुद्धा गेले आहेत. यापूर्वी उच्च दाबाची विद्युत वाहिनी, गेल गॅस वाहिनी, रिलायन्स गॅस वाहिनी तसेच अनेक धरणे उभी राहीली असून या प्रकल्प उभारणीत येथील शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनीचा बळी पडला आहे.
सध्या जिल्ह्यामध्ये रिलायन्स गॅस वाहिनी, मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्ग, पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन, डहाणू येथे वाढवण बंदर असे अनेक प्रकल्प होऊ घातले आहे. सध्या रिलायन्स गॅस वाहिनी व मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्ग यापैकी रिलायन्स गॅस वाहिनीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तर महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. या प्रकाराचा येथील श्रमिक शेतकऱ्यांचा विरोध वाढत आहे. मात्र, भाजपा सरकारने या भांडवलदार कंपन्यांना परवानग्या दिल्या असल्याने गोरगरीब शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत त्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या जात आहेत.
मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्ग येथून जात असून तो १२० किलो मीटर अंतराचा आहे. या महामार्गात अनेक घरे, जमिनी जात असून अनेक जण बेघर होणार आहेत. शिवाय या रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत असल्याने या रस्त्याचा उपयोग स्थानिकांसाठी होणार नाही. गेल्या सहा वर्षांपासून या रस्त्याचे घोंगडे भिजत पडले आहे.