वाहतूक कोंडीतून दिलासा; ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील भुयारी मार्ग खुला
By अजित मांडके | Published: July 31, 2023 10:58 PM2023-07-31T22:58:54+5:302023-07-31T22:59:15+5:30
ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विद्यार्थी, तसेच कोपरीकडून तीन हात नाका येथे येणाऱ्या वाहनांना या भुयारी मार्गाचा वापर करता येणार आहे.
ठाणे : कोपरी ते तीन हात नाका तसेच भास्कर कॉलनी ते ज्ञानसाधना महाविद्यालय अशा अतिशय वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत करणारा पूर्व द्रुतगती महामार्गाखालील भुयारी मार्ग (अंडर पास) सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या भुयारी मार्गासाठी नागरिकांनी केलेली पाच वर्षांची प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली आहे. ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विद्यार्थी, तसेच कोपरीकडून तीन हात नाका येथे येणाऱ्या वाहनांना या भुयारी मार्गाचा वापर करता येणार आहे. त्यामुळे, मल्हार सिनेमा, हरी निवास या भागावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.
कोपरी, आनंदनगर, बारा बंगला, ज्ञानसाधना महाविद्यालय, मनोरुग्णालय या भागात येजा करण्यासाठी तीन हात नाका या अत्यंत वर्दळीच्या मार्गाने वाहतूक करावी लागत होती. तीन हात नाका येथे गर्दीच्या वेळी प्रती तास १३ हजार वाहने येजा करतात. त्यामुळेच, कोपरी येथील रेल्वेवरील पुलाचे रुंदीकरण आणि बांधकाम या अंतर्गत ज्ञानसाधना महाविद्यालय येथे भुयारी मार्गाचे (अंडर पास) काम 'एमएमआरडीए'ने हाती घेतले होते. त्यासाठी सुमारे ६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
या मार्गामुळे शहराच्या दोन्ही भागात वाहतूक करण्यासाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. त्याचा फायदा बारा बंगला, कोपरी, आनंदनगर, मनोरुग्णालय परिसर यांना होणार आहे. तसेच, तीन हात नाका येथील वर्दळही काही प्रमाणात कमी होणार आहे. भुयारी मार्गाच्या कामाचे आदेश एप्रिल २०१८ मध्ये देण्यात आले होते. त्याचे बांधकाम जुलै २०२३ मध्ये पूर्ण करण्यात आले. या मार्गाची लांबी ३६.७५ मीटर एवढी आहे. तर रुंदी २१.२० मीटर एवढी आहे. त्यात चार मार्गिका आणि फुटपाथ यांचा समावेश आहे. तसेच, उंची ४ मीटर आहे. त्यामुळे हा मार्ग सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांसाठी आणि बसेससाठी वापरता येणार आहे.
या भुयारी मार्गातील सुशोभीकरण ठाणे महानगरपालिकेने केले आहे. या मार्गात दोन्ही बाजूंना अतिशय देखणे आणि सुबक असे थ्री डी रंगकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसराला एक वेगळेच रुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांना सुखद अनुभव मिळणार आहे. ज्ञानसाधना महाविद्याल्यासमोरील सेवा रस्त्याचे काम सध्या एमएमआरडीए मार्फत सुरू आहे. तर, नाला आणि कल्वर्हट् यांचे काम ठाणे महानगरपालिका करत आहे.