भरपावसात आमदार बांधावर, शेतकऱ्यांना दिला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 12:11 AM2019-11-09T00:11:57+5:302019-11-09T00:12:13+5:30
शेतकऱ्यांना दिला दिलासा : भातपिकांची केली पाहणी
भातसानगर : शहापूर तालुक्यात शुक्रवार सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे सुकत चाललेली भातशेतीही पाण्यात गेल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्यांसाठी आमदार दौलत दरोडा शेतात पोहोचले. तालुक्यातील शेतकºयांचा पिच्छा पाऊस सोडत नाही. सकाळी जणू पावसाळ्यासारखाच किंवा त्याहीपेक्षा अधिक जोराने पाऊस पडत होता. आज शेतातील भातपीक, पेंढा पाण्यावर तरंगल्याचे दृश्य पाहताच शेतकºयांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
मानेखिंड या गावातील मल्हारी परसू सपाट या शेतकºयाने अडीच एकर जागेत भातशेती लावली होती. पावसाळ्यात पोटाला चिमटा घेऊन आपल्या दोन मुले व पत्नीच्या बरोबरीने मुसळधार पडणाºया पावसाची तमा न बाळगता शेतीची लागवड तब्बल दोन महिने केली. आपल्याला चांगला भात आल्यास पुढील सणासुदीला दिवस चांगले घालवता येतील, अशी अपेक्षा धरूनच शेती केली. वर्षभराची मेहनत अशी डोळ्यांदेखत पाण्यात गेल्याचे दु:ख या शेतकºयांना उघड्या डोळ्यांनी पाहण्याची ही वेळ अतिशय विदारक आहे.
शेतात सोन्यासारखा दाणा डोळ्यांत दिसत असतानाही तो जमिनीवर कोसळला आणि पाण्यात बुडूनच त्याची माती झाली, पण आम्ही काहीच करू शकलो नसल्याची खंत त्याने व्यक्त केली.
आमदार दौलत दरोडा यांनी या शेतकºयांबरोबरच सापगाव येथील बालशा अंदाडे, किशोर सपाट आदी शेतकºयांची मुसळधार पावसातही शेतात जाऊन भेट घेतली व पाण्यात बुडालेल्या भाताच्या दाण्यांना पुन्हा कोंब आलेल्या भाताची पाहणी केली.
शहापूर तालुक्यातील शेतकºयांना हेक्टरी एक लाख रु पये नुकसानभरपाई देण्याची मागणी राज्यपाल यांच्याकडे केली असून ती मिळण्यासाठी विधानसभेत आवाज उठवू, असे दरोडा यांनी सांगितले. तालुक्यात आजच्या इतकी परिस्थिती कधीच नव्हती.
पावसामुळे भातपिके तरंगू लागली
भिवंडी : गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे शेतकºयांनी कापणी केलेल्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कापणी केलेली भातपिके तरंगू लागली आहेत. त्यामुळे शेवटचा उरलेला घासही गेल्याने शेतकºयांच्या डोळ््यात अश्रू तरळू लागले आहेत. शेतीचे पंचनामे सुरू असताना पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने सरकारने भातशेतीच्या नुकसानीचे १०० टक्के नुकसान झाल्याचे जाहीर करून शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.
भिवंडीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतामध्ये सोन्यासारखे आलेले पीक कुजून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी कुटूंब हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील पडघा ,अंबाडी ,खानिवली ,वडवली, अनगाव, कवाड, कुंदे ,दिघाशी ,नांदकर ,बापगांव, मूठवळ, चिंबीपाडा ,कुहे ,धामणे ,खारबांव,पाये, पायगांव, खार्डी,एकसाल, सागांव ,जुनांदुर्खी, टेंभवली ,पालीवली ,गाणे ,फिरिंगपाडा,बासे,मैदे, पाश्चापूर येथे पाऊस झाला. दाभाड येथील शेतकºयांच्या शेतात कापणी करून भारे बांधून ठेवले होते. सायंकाळी उशीर झाल्याने दुसºया दिवशी भाताचे भारे घरी नेण्याचा विचार केला होता. मात्र शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेला घास ही हिरावून घेतल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे . दरम्यान शेतकºयांना आर्थिक मदत उपलब्ध करावी अशी मागणी भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.