उत्तराखंडमधील आपत्तीग्रस्त चमोली जिल्ह्यात श्री माँ ट्रस्टचे मदत कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:43 AM2021-03-09T04:43:34+5:302021-03-09T04:43:34+5:30
ठाणे : उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीग्रस्त चमोली जिह्यात श्री माँ ट्रस्ट, श्री तारा माँ मिशन, श्री ओंकारानंद ट्रस्टद्वारा मदतकार्य करण्यात ...
ठाणे : उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीग्रस्त चमोली जिह्यात श्री माँ ट्रस्ट, श्री तारा माँ मिशन, श्री ओंकारानंद ट्रस्टद्वारा मदतकार्य करण्यात आले. यात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पूर्ण वर्षाची हजारो रुपयांची फी भरणा करण्यात आली, स्त्रियांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गृहोद्योगाला चालना देण्यात आली, निराश्रित मुलींना दत्तक घेण्यात आले, तसेच विस्थापितांना गरजेच्या वस्तूंचे वाटप अशी अनेक कामे करण्यात आली.
उत्तराखंडातील चमोली जिल्हा, तपोवन, जोशी मठ परिसरात हिमप्रलयामुळे नद्यांचे पाणी वाढले. नद्यांना महापूर आला. त्यात नदी किनाऱ्याजवळील लहान वसाहती, गावे प्रचंड पाण्यात वाहून गेली. घरे-दारे, प्राण हानीचा अंदाज करणेच कठीण आहे. या संकट काळात ठाणे, पुणे, हरिद्वार येथील श्री माँ आश्रमाच्या संस्थापक दिव्यश्री तारा माँ यांच्या श्री तारा माँ मिशन आणि श्री ओंकारानंद ट्रस्टतर्फे चमोली जिल्ह्यात मदत कार्य तत्परतेने सुरू करण्यात आले. श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे चेअरमन व विश्वस्त बालगोपाल यांनी मदतीच्या स्थानांची माहिती संपादन केली. तपोवन परिसरातील २७ उदध्वस्त झालेल्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य दिले. त्या कुटुंबांतील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या २०२१-२२ या शालेय वर्षातील एकूण फी तसेच शासकीय इंटरकॉलेजच्या विद्यार्थ्यांची फी श्री माँ यांनी त्या त्या संस्थेत भरणा केली. पुराच्या प्रवाहात सर्व काही वाहून गेलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन ब्लँकेट, संसाराच्या भांड्यांचे दोन संच, कढई, साड्या, थंडीसाठी थर्मलसेट, सोलार दिवे, मुलांना कपडे व गरजेच्या वस्तूंचे वाटप केले. या कुटुंबांशिवाय इतरांना १२० ब्लँकेट व १२० सोलार कंदील ४० थर्मल आणि कपडे वाटप केले.