कोरोना रोखण्यासाठी धार्मिक संस्थांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:41 AM2021-03-26T04:41:00+5:302021-03-26T04:41:00+5:30
भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भिवंडीत डोके वर काढले असून पालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना वेळोवेळी ...
भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भिवंडीत डोके वर काढले असून पालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या जात आहेत, मात्र नियमांचे पालन होताना दिसत नाही. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धार्मिक संस्थांनीच पुढाकार घ्यावा असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी धार्मिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांना केले आहे.
कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने खबरदारी व जनजागृती म्हणून सर्व प्रमुख धार्मिक संस्थांचे विश्वस्त, पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत गेल्यावर्षी कोरोना काळात स्थानिक धार्मिक, सामाजिक संस्था यांनी फार चांगल्या प्रकारे काम केल्याने आजही भिवंडी सुरक्षित आहे अशी प्रशंसा केली. भविष्यात धार्मिक व सामाजिक संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात विविध माध्यमांद्वारे नागरिकांना कोरोनाबाबत जनजागृती करावी, अधिकाधिक नागरिकांना लस घेण्याकरिता आवाहन करावे तसेच लस सुरक्षित असून त्याचे कोणत्याही प्रकारे दुष्परिणाम होत नाहीत त्यामुळे संस्थांनी नागरिकांमध्ये जनजागृती करावी असेही आशिया म्हणाले.
मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही मोहल्ला क्लिनिक सुरू करावीत यासाठी स्थानिक धार्मिक, सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक सहकार्य प्रशासन करेल असे आश्वासनही आयुक्तांनी दिले.