धार्मिक जागेवर सनद, भूखंडांवर माफियांची नजर, उल्हासनगर बंदचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 02:35 AM2019-06-10T02:35:50+5:302019-06-10T02:36:57+5:30
उल्हासनगर बंदचे आवाहन : जाब विचारण्यासाठी प्रांत कार्यालयावर धडक देण्याचा निर्धार
उल्हासनगर : सिंधी समाजाच्या धार्मिक जागेवर सनद दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी शहरबंदचे आवाहन सोशल मीडियाद्वारे केले जात आहे. सनदप्रकरणी प्रांत कार्यालय गाठून जाब विचारण्याचा निर्धार केला जात असल्याने, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं.-५ येथे शहराची स्थापना झाली, तेव्हापासून सिंधी समाजाचा एक प्रसिद्ध दरबार आहे. तेथे सिंधी समाजाचे विविध कार्यक्रम दरवर्षी होतात. या जागेवरही सनद दिल्याने वाद उद्भवला आहे. सन १९३८ दरम्यान ब्रिटिश सरकारने महायुद्धाच्या वेळी येथे लष्करी छावणी सुरू केली. भारताच्या फाळणीवेळी सिंध प्रांतातील सिंधी समाजाला विविध ठिकाणी वसवण्यात आले. त्यापैकी एक लाखापेक्षा जास्त सिंधी समाजाला ब्रिटिशकालीन छावणीतील जागेत वसवण्यात आले. ज्यांच्याकडे १९६० पूर्वीचा जागेवर ताबा आहे, अशांना पुरावा सादर केल्यावर सनद म्हणजे जागेचा मालकी हक्क देण्याचे काम प्रांत कार्यालयामार्फत राज्य शासनाने केले. ब्रिटिशकालीन छावणी वसवण्यापूर्वी तत्कालीन शासनाने स्थानिक गाववाल्यांच्या जमिनी घेतल्या, असा कांगावा करून सनदच्या नावाखाली जागेची मालकी प्रांत कार्यालयाकडून घेतली जात आहे.
कॅम्प नं.-४, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या धोकादायक बंद पोलीस निवासस्थानावर अशीच सनद दिल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यादीत सदर निवासस्थाने पोलिसांची मालमत्ता दाखवली आहे.
बंदमध्ये राजकीय नेते सहभागी होणार का?
च्पोलीस वसाहतीसह सिंधी समाजाच्या एका धार्मिक दरबारावरही सनद काढण्यात आली. दरबारातील संतांनीही नाराजी व्यक्त करून या निषेधार्थ प्रांत कार्यालयावर धडक देणार असल्याचे सांगितले. समाजातील नेत्यांनी याविरोधात बंदचे आवाहन केले.
च्स्थानिक नेते शहर बंदमध्ये सहभागी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र शहरातील व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.