गटार, नाल्यातून जाणाऱ्या विद्युत वाहिन्या ३० मेपूर्वी स्थलांतरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:42 AM2021-05-11T04:42:20+5:302021-05-11T04:42:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड : मीरा भाईंदरमधील गटार-नाले तसेच सखल भागातील विद्युत वाहिन्या आणि मीटर यंत्रणा ३० मेपर्यंत अन्यत्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड : मीरा भाईंदरमधील गटार-नाले तसेच सखल भागातील विद्युत वाहिन्या आणि मीटर यंत्रणा ३० मेपर्यंत अन्यत्र हलविण्याचे आदेश महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी वीज कंपन्यांना दिले आहेत. अतिवृष्टीत वीजपुरवठा खंडित होण्यासह दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. १५ मेनंतर अत्यावश्यक व दुरुस्ती कामाशिवाय खोदकाम करण्यास मनाई केली आहे.
आयुक्त ढोले यांनी अलीकडेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक बोलावली होती. उपायुक्त संभाजी पानपट्टे, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मनस्वी म्हात्रे, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे, सहायक पोलीस आयुक्त विलास सानप यांच्यासह महानगर गॅस, एमटीएनएल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मीरा भाईंदर तहसीलदार, टाटा पॉवर, अदानी इलेक्ट्रिसिटी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी गटार, नाल्यांमधून जाणाऱ्या विद्युत वाहिन्या ३० मेपूर्वी हलविण्याचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टीमुळे सखल भागातील इमारतींच्या तळ मजल्यामध्ये पाणी शिरते. अशा ठिकाणची विद्युत मीटर पाण्याखाली गेल्याने शॉर्टसर्किट होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे अशा इमारती शोधून सदर इमारतींचे विद्युत मीटर उंचीवर हलविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
पावसाळा कालावधीत वाहतूक सुरळीत ठेवणे, अतिवृष्टीच्या वेळी पर्यायी मार्गांची निवड करणे, आपत्कालीन परिस्थितीत शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर आयुक्तांनी सूचना दिल्या. तसेच, १५ मेनंतर अत्यावश्यक व दुरुस्ती कामाव्यतिरिक्त कोणत्याही खोदकामास महापालिकेमार्फत परवानगी देण्यात येणार नाही. सेवा वाहिन्यांच्या जाळे असलेल्या ठिकाणी चेंबर्सची ३० मेपूर्वीच सफाई करण्यात यावी, असे निर्देशही दिले.
महसूल विभागाने अधिकारी-कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करून पूर परिस्थितीत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन पंचनामे करण्यास विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही आयुक्तांनी नमूद केले.
.............
वाचली