मीरा रोडमध्ये रेमडेसिविरची काळ्या बाजारात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 05:41 AM2021-04-22T05:41:35+5:302021-04-22T05:41:38+5:30
मीरा रोड भागात रेमडेसिविर इंजेक्शन काळ्या बाजारात विकली जात असल्याची माहिती परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांना मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : एकीकडे कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा भासत असताना होण्याच्या घटना वाढत आहेत. मीरा रोडमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात तब्बल १६ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या योगेश संतोष पवार (२१) रा. वांद्रे व अस्मिता नारायण पवार (२१) रा. नालासोपारा या दोघांना पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या पथकाने अटक केली. दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी असून त्यांच्याकडून रेमडेसिविरची पाच इंजेक्शन जप्त करण्यात आली.
मीरा रोड भागात रेमडेसिविर इंजेक्शन काळ्या बाजारात विकली जात असल्याची माहिती परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांना मिळाली. काळे यांच्या पोलीस पथकाने लाइफलाइन रुग्णालयात काम करणारी अस्मिता हिच्याकडे इंजेक्शनसाठी बनावट गिऱ्हाईक पाठवले असता तिने योगेशला सांगितले. योगेशने बोरिवलीच्या खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिलेस कळवले. एका इंजेक्शनची १६ हजार रुपये किंमत ठरवून योगेश व अस्मिताला भाईंदर उड्डाणपुलाखाली असलेल्या शिधावाटप कार्यालयाजवळ पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून एकूण पाच इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत.
पोलिसांनी दोघांना अटक करून नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना ठाणे न्यायालयात हजर केले असता २४ एप्रिलपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास नयानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुहेल पठाण हे करीत आहेत. योगेश हा महापालिकेने कंत्राटी पद्धतीने चालवण्यास दिलेल्या भाईंदरच्या प्रमोद महाजन कोविड उपचार केंद्रातील आयसीयू विभागात काम करणारा कर्मचारी आहे. महाजन उपचार केंद्रात मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या नातलगाकडे रेमडेसिविरचे एक इंजेक्शन शिल्लक होते. ते ४ हजार ८०० रुपयांना नातलगाने त्याला विकले होते, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. पोलीस बोरिवलीच्या रुग्णालयातील त्या महिलेचा शोध घेत आहेत.
दोघांना अटक; दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी; तब्बल १६ हजार रुपयांना विकले रेमडेसिवीर