जुन्या ठाण्याची २९ वर्षांनी आठवण, टीडीआरसाठी महासभेत मांडली लक्षवेधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:36 AM2018-04-20T01:36:34+5:302018-04-20T01:36:34+5:30
जुन्या ठाण्याच्या विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. जुन्या ठाण्यातील इमारतींच्या पुनर्विकासासाठी टीडीआर मिळावा, यासाठी रस्त्यांची रुंदी ९ मीटरपेक्षा कमी करावी, अशी प्रस्तावाची सूचना भाजपाने मांडली आहे.
ठाणे : जुन्या ठाण्याच्या विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. जुन्या ठाण्यातील इमारतींच्या पुनर्विकासासाठी टीडीआर मिळावा, यासाठी रस्त्यांची रुंदी ९ मीटरपेक्षा कमी करावी, अशी प्रस्तावाची सूचना भाजपाने मांडली आहे. असे असताना आता मागील विधानसभा निवडणुकीपासून पिछाडीवर पडलेल्या शिवसेनेलादेखील आता या परिसराच्या विकासाची तब्बल २९ वर्षांनंतर आठवण झाली आहे. त्यानुसार, शिवसेना यासंदर्भात थेट लक्षवेधी सूचना शुक्रवारी होणाऱ्या महासभेत मांडणार आहे. त्यामुळे महासभेत भाजपाच्या प्रस्तावाच्या सूचनेवर चर्चा होणार की, शिवसेनेच्या लक्षवेधीवर चर्चा होणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
मागील कित्येक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असणाºया शहरातील अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचा पुनर्वसनाचा मार्ग समूह विकास योजनेच्या अर्थात क्लस्टर योजनेच्या माध्यमातून मोकळा होणार असला, तरी जुन्या ठाण्यावर मात्र ही टांगती तलवार कायम आहे. आताच्या डीसी रूलप्रमाणे ९ मीटरपेक्षा कमी रु ंदी असलेल्या रस्त्यामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी टीडीआर मिळणे अशक्य आहे. त्यामुळे जुन्या ठाण्यातील अनेक इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न रखडला आहे. ठाणे शहरातील म्हणजेच ठाणे पूर्व ते माजिवडा सेक्टर १ ते ३ हे भाग जुने ठाणे म्हणून ओळखले जातात. या भागातील बहुतांश इमारती अधिकृत तसेच ग्रामपंचायत आणि नगरपालिका काळातील आहेत. त्यावेळच्या नियमांप्रमाणे आणि वाहने, होणारी वाहतूक लक्षात घेऊन रस्त्यांची रुंदी घेण्यात आली, त्याचप्रमाणे नियमदेखील करण्यात आले. त्यामुळे एकीकडे रस्त्यांची रुंदी खूप कमी राहिली आहे. तर, दुसरीकडे इमारती जुन्या झाल्यामुळे त्यांचा पुनर्विकासदेखील आवश्यक झाला आहे. आताच्या विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे ९ मी.पेक्षा कमी रुंदी असलेल्या रस्त्यांमुळे पुनर्विकासासाठी टीडीआर मिळू शकत नाही. काही ठिकाणी मुख्य रस्त्याच्या जोडरस्त्याला इमारत ५० मी.पेक्षा जास्त अंतरावर असते, त्यामुळे तेथेही टीडीआर उपलब्ध होऊ शकत नाही व पुनर्विकासात अडथळे येतात. त्यामुळे या भागाचा पुनर्विकासासाठी बीएमसी सेस इमारतींच्या पुनर्विकासाप्रमाणे अथवा नवी मुंबईच्या धोरणाप्रमाणे पुनर्विकास करावा, अशा आशयाची लक्षवेधी सूचना आता सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मांडली आहे.
दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी याचसंदर्भात प्रस्तावाची सूचना महासभेत मांडली आहे. त्यानंतर, अवघा एक दिवस उलटत नाही, तोच म्हस्के यांनी थेट लक्षवेधी मांडून सर्वांचेच लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निवडणूक लागण्याआधीच आता जुन्या ठाण्याच्या मुद्यावरून शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष निर्माण झाला आहे.
बालेकिल्ला स्वत:कडे ठेवण्यासाठी सेनेचे शर्थीचे प्रयत्न
- मागील २९ वर्षे जुन्या ठाण्यावर शिवसेनेचा वरचष्मा होता. परंतु, मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात भाजपाचे कमळ फुलले. त्यानंतर, झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतदेखील भाजपाच्या नगरसेवकांची संख्या येथे सहा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही दोनवर आली.
त्यामुळे शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला जणू सुरुंगच लागल्याचे दिसून आले. त्यात आता पुन्हा भाजपाने जुन्या ठाण्याकडे लक्ष केंद्रित केले असतानाच हा बालेकिल्ला पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून भाजपाला धोबीपछाड करण्यासाठीच ही लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.